साऊथ क्रॉस युनिव्हर्सिटी ऑफ ऑस्ट्रेलिया येथील विदेशी पर्यटकांनी आज येळ्ळूरच्या राजहंसगडावर उपस्थिती दर्शवून शिवरायांचे दर्शन घेतले.
बेळगाव तालुक्यातील पर्यटकांचा केंद्रबिंदू समजल्या जाणाऱ्या राजहंसगड किल्ल्यावरती आज ऑस्ट्रेलियन पर्यटकांचे आगमन झाले. साऊथ क्रॉस युनिव्हर्सिटी ऑफ ऑस्ट्रेलिया येथील जवळपास 25 ते 30 पर्यटकांनी राजहंसगड किल्ल्यावरती भेट देत गडावरील श्री सिद्धेश्वर मंदिर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे दर्शन घेत गडाची भ्रमंती केली. यावेळी श्री सिद्धेश्वर मंदिर आणि शिवरायांचे दर्शन घेताना चप्पल – बूट बाजूला ठेवत शिवरायांप्रती असलेला आदर व्यक्त केला.
राजहंसगडावरील तैनात असलेल्या टुरिझम डिपार्टमेंटच्या पोलिसांकडून पर्यटकांना सहकार्य करण्यात आले. यावेळी गडावरील पुरातन वास्तू, दगडी बांधकाम, बाहेर पडण्याचा चोर दरवाजा, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वात उंच मूर्ती, किल्ल्याचे सुशोभीकरण, व स्वच्छता पाहून विदेशी पर्यटक भारावून गेले. जवळपास तीन तास विदेशी पर्यटकांनी गडावरती पर्यटनाचा आनंद लुटला.
पर्यटकांची उपस्थिती पाहता या ठिकाणी पार्किंग, स्वच्छतागृह यासह इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे गरजेचे आहे.
Recent Comments