Belagavi

बेळगावात खासगी रुग्णालयाच्या दुर्लक्षामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू

Share

गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी बेळगावच्या खासगी रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप करत खडेबाजार पोलीस स्थानकासमोर संतप्त नातेवाईकांनी निदर्शने केली.

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा संताप व्यक्त करत नातेवाईकांनी आज खडेबाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. बेळगाव तालुक्यातील कंग्राळी गावातील आरती चव्हाण (३२) या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. आरतीला मंगळवारी सकाळी पोटात दुखू लागल्याने गोंधळी गल्लीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पंचवीस हजार रुपये भरल्यानंतर सकाळी अकरा वाजता डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली. मात्र या दरम्यान सदर गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. महिलेच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला होता. या घटनेप्रकरणी रुग्णालय, डॉक्टर यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. खडेबाजार पोलीस स्थानकाच्या व्याप्तीत हि घटना घडली आहे.

मृत महिलेच्या कुटुंबीयांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले, गोंधळी गल्ली येथील रुग्णालयात सकाळी सदर महिलेला दाखल करण्यात आले. पोट दुखू लागल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी सदर महिला चार महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर सहा महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगण्यात आले. शस्रक्रिया पार पडल्यानंतर दुपारी २ च्या सुमारास तिच्या पोट दुखीत वाढ झाली.

रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्याचे परिचारिकांनी उपचार केले. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास डॉक्टर आले असता त्यांनी बीपी लो असल्याचे सांगितले. पुढील उपचारासाठी के एल इ रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेत असताना वाटेतच महिलेचं मृत्यू झाला. रुग्णालयात तीन तासात योग्य पद्धतीने उपचार करण्यात आले नाहीत. डॉक्टर आणि रुग्णालयाच्या दुर्लक्षपणामुळे आरती चव्हाण या महिलेला जीव गमवावा लागला असा संताप कुटुंबीयांनी व्यक्त केला.

तीन तास रुग्णाला रुग्णालयातच ठेवून दुर्लक्ष करण्यात आल्याने हि परिस्थिती ओढवली आणि रुग्णाला जीव गमवावा लागला असा संताप व्यक्त करत मृत महिलेच्या कुटुंबीयांनी निदर्शने केली.  मृत गर्भवती महिलेच्या भावाने प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले, कि रात्रभर आरतीला त्रास होत असूनही परिचारिकांनी दुर्लक्ष केले. डॉक्टरांनीही याकडे लक्ष दिले नाही परिणामी आपल्या बहिणीला जीव गमावण्याची वेळ आली नाही. योग्य वेळेत उपचार आणि लक्ष देण्यात आले असते तर आपल्या बहिणीचा जीव वाचला असता अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

Tags: