काल गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी घटस्थापनेचा मुहूर्त साधून बेळगाव व सीमा भागातील युवकांनी सीमाप्रश्न व त्या संदर्भात होणाऱ्या घडामोडी यांची चर्चा करण्यासाठी मराठा मंदिर येथे एक बैठक आयोजित केली होती, या बैठकीच्या अध्यक्षस्थानी बेळगाव महानगर पालिकेचे विद्यमान नगरसेवक शिवाजी मंडोळकर हे होते, या बैठकीत समितीच्या अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांनी प्रखरपणे आपली मते मांडली, उपस्थितांचे स्वागत मध्यवर्तीचे सदस्य मनोहर हुंदरे यांनी केले, प्रास्ताविक करताना खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी बैठकीचा उद्देश सविस्तरपणे मांडला,
गेल्या 68 वर्षात अनेक लढे आंदोलने झाली महाराष्ट्र एकीकरण समिती ही प्रामुख्याने सीमाप्रश्न ची सोडवणूक व सीमाभागात मराठी भाषेच्या हक्कांसाठी व न्यायालयीन लढ्याच्या संदर्भात अग्रेसर असते, त्यामध्ये मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती ही या लढ्याची केंद्रबिंदू असून शिखर समिती आहे, लढ्यातील आंदोलन असेल मराठी भाषेच्या संवर्धन असेल किंवा 2004 साली जो महाराष्ट्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात सीमा प्रश्नाचा दावा दाखल करण्यात आला त्या खटल्यातील दाव्या संदर्भात लागणाऱ्या पुराव्यासह कागदपत्रांची पूर्तता ही मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती महाराष्ट्र सरकारसह सर्वोच्च न्यायालयात करत असते,
त्यासाठी गेल्या वर्षी विधानसभा निवडणूक झाली किंवा त्यापूर्वीची लोकसभेची पोटनिवडणूक व महानगर पालिकेची निवडणुक झाली त्यामध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं, पण गेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार श्री. महादेव पाटील यांना पडलेली मते पाहता कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साहाचं वातावरण असल्याचे निदर्शनास आले. 51 वर्षे समितीत निष्ठेनं कार्यरत राहणाऱ्या कार्यकर्त्याला उमेदवारी देण्यात आली, हा जिव्हारी लागणारा पराभव महादेव पाटलांचा नसून समस्त मराठी जनतेचा होता, त्यासाठी सीमा लढ्यासाठी म्हणून अग्रेसर असणाऱ्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे पाठबळ वाढवून या लढ्याला गती देऊन येत्या काळात आरपारची लढाई लढण्याचे बैठकीत ठरविण्यात आले,
बैठकीला संबोधित करताना महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते शुभम शेळके यांनी आपले मत मांडताना येत्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत सर्व पक्षांना एक पत्र लिहून त्यांना आपल्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात सीमाप्रश्न आपली भूमिका मांडावी, असा ठराव मांडला त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली, त्यानंतर बैठक चालू असतानाच केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आल्याचे घोषित केले अशी बातमी आली, त्यानंतर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून यापूर्वी महाराष्ट्रातील विविध सरकारी असतील विविध पक्षाचे नेते असतील साहित्यिक असतील ज्यानी त्याचा पाठपुरावा केला व तसेच काल केंद्र सरकारने त्याला मान्यता दिल्याने केंद्र सरकार व या सर्वांचे आभार मानण्याचा ठराव करण्यात आला, तर समस्त मराठी भाषिकांचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी मनोहर हुंदरे यांनी आपले मत व्यक्त करताना आजपर्यंत सीमालढ्याशी आम्ही बांधील आहोत यापुढेही अस्मितेच्या लढ्याशी बांधील होऊन आम्ही कार्यरत राहू व बैठकीचे ठराव होतील किंवा याची पुढील वाटचाल असेल मध्यवर्तीच्या माध्यमातून ध्येयनधोरणाशी बांधील असून आम्ही यापुढे कार्यारत राहू असे सांगितले,
युवा कार्यकर्ता सुशील पाटील याने सर्वोच्च न्यायालयातील ज्या घडामोडी घडत आहेत तिथं बरीच वर्षे झाली सर्वोच्च न्यायालयात तारीख बोर्ड मेन्शन झाली नाही व ज्यावेळी मेन्शन होऊन बोर्डावर आली त्यावेळी सुनावणीच झाली नाही, भारत सरकारकडून बोर्डावर हा विषय येण्यासाठी व सुनावणी होण्यासाठी महाराष्ट्र व केंद्रसरकारवर दबाव आणला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही या माध्यमातून पाठपुरावा करूया असे सांगितले, सागर कणबरकर यांनी बोलताना असे सांगितले की मी माझ्या आजोबांकडून ह्या सीमा लढ्याचं बाळकडू घेतलेल आहे आणि आजही आम्ही आरपारची लढाई लढण्यासाठी आणि अंगावर गोळ्या सुद्धा झेलण्यासाठी तयार आहोत असे आक्रमकपणे सांगितले,
युवासेनेचे विनायक हुलजी यांनीही आम्ही या कन्नड सक्तीला जशास तसे उत्तर देण्यासाठी तयार आहोत तर मल्हारी पावशे यांनी आपण जरी युवासेनेत कार्यरत राहिलो तरी कुठल्याही परिस्थितीत सीमाप्रश्नासाठी समितीच्या झेंड्याखाली कार्यरत राहण्यासाठी सज्ज आहोत असे सांगितले, सुनील बोकडे यांनी मार्गदर्शनपर भाषण करत असताना यापुढे ही लढाई आपण वैचारिकपणे आणि संयमाने लढावे लागणार आहे आणि हा सीमाप्रश्न सोडवावा लागणार असे सांगिताना ज्येष्ठ मंडळींचं मार्गदर्शन आवश्यक असून त्यांना विश्वासात घेऊन कार्यरत राहूया तर रमेश माळवी यांनी गाव संघटित राहिल्याने आपल्या खादरवाडी गावातील शेतकऱ्यांच्या जमिनीचा प्रश्न कसा सुटला हे सांगताना समितीही संघटित राहिली तर यश दूर नाही याबद्दल आपल्या भाषणातून संबोधित केले,
आपण जर एकजुटीने कार्यरत राहू तर हा सीमाप्रश्न सोडवताना युवकांना कोणतीही अडचण येणार नाही, पूर्वी झालेल्या संघर्षातून प्रेरणा घेऊन महाराष्ट्र एकीकरण समिती, मध्यवर्ती महाराष्ट्र समितीच्या ध्येय धोरणाशी बांधली राहून यापुढेही कार्यरत राहावे असे रणजीत हावळाणाचे यांनी सांगितले, तर पीरनवाडी येथील युवा कार्यकर्ते नारायण मुचंडीकर यांनी आपल्या भागातून जितकी होईल तेवढी यापुढेही जागृती करून आपण कोणतेही हेवे दावे न ठेवता आणि पदासाठी न भांडता आपण निष्ठेने कार्यरत राहून महाराष्ट्र समितीचे हात बळकट करूया आणि या लढ्याला जिंकूनच पूर्णविराम देऊया, असे संबोधित केले, शांताराम होसुरकर यांनी मला कधीही मुंबई किंवा महाराष्ट्र सरकार घेऊन गेलात तर मी त्यांना ठणकावून सांगेन की एक तरी आम्हाला बसल्या ठिकाणी सीमा प्रश्न सोडवा नाहीतर इथून बेळगाव जाताना आम्ही कर्नाटक संबोधन जाईन,असा निर्वाणीचा इशारा महाराष्ट्र सरकारला दिला,
भावेश बिर्जे यांनी बऱ्याच वेळेला जेव्हा निवडणुकीचा काळ येतो त्यावेळेला आपल्या दुही निर्माण होते व युवक राष्ट्रीय पक्षाकडे वळतो, तो पुन्हा समितीकडे येत नाही, त्यासाठी या निवडणुका जेव्हा येतील तेव्हा येतील पण आमच्या नेते मंडळी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय पक्षाशी संधान न बांधता समितीशी निष्ठावंत राहून कार्यरत राहणे गरजेचे आहे, असे सांगितले, अध्यक्षीय भाषणात नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांनी आज पर्यंत सीमा लढा हा निष्ठेने आणि आक्रमकतेने लढले आहे त्याचप्रमाणे आपणही यापुढे मध्यवर्ती महाराष्ट्र समितीच्या नेत्यांना विश्वासात घेऊन या पुढील मार्गक्रमण अगदी निष्ठेने करूया आणि जो काही आदेश महाराष्ट्र समिती देईल त्यासाठी मी व माझे कार्यकर्ते सतत कार्यरत राहतील असे सांगितले, शेवटी युवा कार्यकर्ते प्रवीण रेडेकर यांनी आभार मानले व बैठकीची सांगता झाली.
या बैठकीला चंद्रकांत पाटील, विजय नेताजी जाधव, दत्ता पाटील,अभिजीत मजुकर, राजू पाटील,गोपी पाटील,किरण मोदगेकर,अशोक घगवे, सुरज जाधव,राजू मोदगेकर,इंद्रजित धामणेकर,जोतिबा येळ्ळूरकर,सुधीर शिरोळे,अजय सुतार,परशुराम कुंडेकर,रोहित गोमाणाचे,योगेश भेकणे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
Recent Comments