बेळगावमधील दसऱ्याचे स्वरूप हळूहळू बदलत चालले असून दरवर्षी महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्राची प्रतिकृती साकारून नवरात्र साजरी करणाऱ्या कांगली गल्ली येथील एकता युवक मंडळाच्या वतीने यंदा श्रीक्षेत्र पंढरपूरची प्रतिकृती साकारली आहे. या प्रतिकृतीत श्री विठ्ठल – रखुमाईच्या मूर्तीचा आगमन सोहळा भव्य शोभायात्रेने काल पार पडला.
गुरुवारी सायंकाळी सुरु झालेल्या शोभायात्रेत अवघी पंढरीच अवतरल्याचा भास झाला. राणी कित्तूर चन्नम्मा चौकापासून कॉलेज रोड मार्गे निघालेल्या शोभायात्रेत शितोळे सरकारच्या अश्वांचा पार पाडलेला उभा रिंगण सोहळा लक्षवेधी ठरला.
देहू, आळंदी येथील २५०० वारकऱ्यांच्या समूहाचा या शोभायात्रेत रिंगण सोहळा पार पडला. विविध कला पथके, सजीव देखावे, विविध वेशभूषेत सहभागी झालेले कलाकार, खेळांची प्रात्यक्षिके, ढोल ताशा, अभंग आणि वारकऱ्यांच्या ठेक्यात सुरु असलेली शोभायात्रा पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती.

कांगली गल्ली येथे साकारण्यात आलेल्या पंढरपूरच्या प्रतिकृतीत पंढरपूरप्रमाणेच दररोज पूजा करण्यात येणार असून वडगाव येथून श्री संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे आगमन होणार आहे. तसेच दररोज काकडआरती व हरिपाठाची महा आरती होणार आहे. 6 ऑक्टोबर रोजी महाप्रसाद होणार असल्याची माहिती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी इन न्यूजला दिली.
बेळगावातील या महोत्सवात आपल्या मुलीसह शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मारबानयांग देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी बेळगावच्या सांस्कृतिक परंपरेचे कौतुक केले.
श्री गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर बेळगावच्या नारायणीचा आगमन सोहळा लक्षवेधी ठरला. हि शोभायात्रा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.


Recent Comments