महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त जिल्हा प्रशासनातर्फे बेळगावातील वीरसौध येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांनी 1924 च्या राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षस्थान भूषविले होते.
महापौर सविता कांबळे, उपमहापौर आनंद चव्हाण, आमदार आसिफ सेठ, महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद, शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मारबानयांग आदी मान्यवरांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी स्वराज्य सुराज्य व स्वच्छ सुंदर भारत निर्माण करण्याची शपथ दिली. यावेळी बेळगावातील प्रसिद्ध साहित्यिक शिरीष जोशी यांचे व्याख्यान झाले.

याबाबत माहिती व जनसंपर्क विभागाचे उपसंचालक गुरुनाथ कडबूर म्हणाले, आज राष्ट्रपिता महात्मा गांधीजी आणि लाल बहादूर शास्त्रीजी यांचा जन्मदिन आहे. बेळगाव येथे झालेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचा यंदा शताब्दी सोहळा असून ही बेळगावची शान असल्याचे ते म्हणाले.
राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन बेळगावात झाले याचा आपल्याला अभिमान आहे असे मत आमदार आसिफ सेठ यांनी व्यक्त केले. इथूनच स्वातंत्र्यलढा अधिक तीव्र झाला. देशासाठी ज्यांनी बलिदान दिले, त्यांचे नेहमी स्मरण ठेवावे. राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचा भाग म्हणून वर्षभर कार्यक्रम होणार असून बेळगाव अधिवेशनात विशेष कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी विविध प्रशासकीय अधिकारी, मान्यवर आदी उपस्थित होते.


Recent Comments