शहापूर बँक ऑफ इंडिया सर्कल ते ओल्ड पी बी रोड च्या बांधकामावरून मनपाला बसलेल्या भुर्दंडाविरोधात माजी आमदार रमेश कुडची यांनी संताप व्यक्त करत पालिका अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे.
बेळगावमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. घडलेल्या प्रकाराबाबत मनपा बैठकीत उत्तर देईन असे सांगणाऱ्या दक्षिण मतदार संगःच्या आमदारांनी जाहीरपणे आपले उत्तर सांगावे. यासंदर्भात पालिकेत चर्चा करण्याऐवजी जाहीर पणे स्पष्टीकरण देण्यात कोणती अडचण आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
शहापूर येथील बँक ऑफ इंडिया चौकापासून जुन्या पी बी रोडच्या रस्ते कामकाजात जागा गेलेल्या जागामालकांना भरपाई दिल्यानंतर रस्त्यासाठी खर्च झालेल्या निधीची भरपाई कोण करणार असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
सदर रस्ता निर्मितीसाठी कोणत्या अधिकाऱ्याने सूचना दिली त्या अधिकाऱ्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. एकाने केलेल्या चुकीची शिक्षा पालिकेच्या माथ्यावर का मारण्यात येत आहे? असा प्रश्न यावेळी माजी आमदारांनी उपस्थित केला.
उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणे हे सर्वांचेच कर्तव्य आहे. महापौरांनी बैठकीत २० कोटींच्या भरपाईचा ठराव पास केला हे दुर्दैव आहे. यासाठी बळीचा बकरा करण्याचे धोरण अवलंबिल्याची टीका करत मनपा व्याप्तीत येणाऱ्या आमदारांना नगरसेवक नको आहेत असा गंभीर आरोपही केला.
बेळगावमधील हुलबत्ते कॉलनी येथील समस्या १९८८ पासून जैसे थे आहे. हुलबत्ते कॉलनी पासून छ. शिवाजी उद्यानापर्यंतच्या रस्त्यासंदर्भात तत्कालीन पालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले होते. मात्र अद्यापही या भागाची समस्या दुर्लक्षित असल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.


Recent Comments