Belagavi

मापात पाप! व्यापाऱ्याने शेतकऱ्यांची केली वजनात फसवणूक : कडोलीतील प्रकार

Share

शेतकरी हा काबाडकष्ट करून पीक उत्पादन घेतो. मात्र व्यापारी शेतकऱ्यांची लूट करत असतील तर त्याच्यावर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे. कडोली, जाफरवाडी, देवगिरी मधील शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या अशाच एका व्यापाऱ्याला खुद्द शेतकऱ्यांनीच अद्दल घडविली आहे.. पाहुयात यासंदर्भातील हा रिपोर्ट…

धान्य खरेदी करताना शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याचा धंदा शेतकऱ्यांनी उघडकीस आणल्याची घटना बेळगाव तालुक्यातील कडोली ग्रामपंचायत अंतर्गत जाफरवाडी गावात घडली आहे.

बेळगावातील कणबर्गी गावातील संतोष वीरगौड या व्यापाऱ्याने कडोली भागात येणाऱ्या गावात जाऊन शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी केले. मात्र यावेळी वजनात चक्क १० ते १२ किलोचा फरक जाणवल्याने सतर्क शेतकऱ्यांनी वजन काटे तपासण्याचा निर्णय केला आणि व्यापार्याची लबाडी यावेळी उघड झाली. ज्यावेळी शेतकऱ्यांनी व्यापाऱ्याकडे असणारी सर्व मोजमापाची यंत्रे आणि वजनकाटे तपासले असता सर्व गोष्टी उघड झाल्या. यावेळी शेतकऱ्यांनी वजन व वजन व मापे विभागाच्या विभाग २ चे निरीक्षक आर.आय. बिसगुप्पी आणि निरीक्षक आर.एम.राजगोळी यांच्याशी संपर्क साधला. यावेळी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी या प्रकारची पाहणी केली. दरम्यान हा व्यापारी अधिकृत डीलर नसल्याचे उघड झाले असून सदर व्यापाऱ्याचे सर्व साहित्य अधिकाऱ्यांनी जप्त केले आहे.

यावेळी शेतकरी नेते आप्पासाहेब देसाई यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी सदैव लढा देत राहू. शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. अशा फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. अशा घटनांबाबत अधिकाऱ्यांनी जनजागृती करावी, असेही ते म्हणाले.

यावेळी राजू कागणीकर, शंकर देसाई, सुभाष धायगोंडे, वैजाप्पा पाटील, फकिराप्पा सदावर, तानाजी पाटील, शिवाजी पाटील, सुधाकर पाटील, पुंडलिक पाटील, कटांबळे आदींसह कडोली, जाफरवाडी, देवगिरी गावातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमले होते.

Tags: