Belagavi

जातीयवाद आमच्यात नाही! मात्र..भाजपकडून ‘डिव्हाइड अँड रुल’ धोरण! : आम. असिफ सेठ

Share

जाती-धर्मात फूट पाडण्याचे भाजपचे धोरण लोकांना कळले असून बेळगावात सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र आले आहेत. यामुळे जातीयवाद सोडून विकासावर लक्ष केंद्रित करा असे आवाहन बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी भाजपला केले आहे.

आज बेळगावात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आमदारांना सरकार अनुदान देत नाही का, या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, जिल्हा प्रभारी मंत्र्यांनी यापूर्वीच फ्लाय ओव्हरसाठी 400 कोटींचे अनुदान दिले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बांधकामासाठी 200 कोटी तर पहिल्या टप्प्यात नवीन स्टेडियमच्या बांधकामासाठी 50 कोटी देण्यात आले आहेत. अल्पसंख्याक महामंडळाकडून 25 कोटी आणि 10 कोटींचे अनुदान मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. भाजप आमदारांचे आरोप हे खोटे आहेत. 1000 कोटींचे नगरविकास अनुदान लवकरच जारी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शहराची स्वच्छता राखणाऱ्या नागरी कर्मचाऱ्यांच्या समस्यांसंदर्भात कायमस्वरूपी तोडगा करण्यात येणार आहे. 20 कोटींच्या नुकसान भरपाई प्रकरणी महापालिकेने उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले आहे. जिल्हा पालक मंत्री या प्रकरणाची चौकशी करत असल्याचे त्यांनी सांगितले.

काँग्रेसची सत्ता येताच जातीय दंगली वाढतात असा दावा भाजप खासदारांकडून करण्यात येत असून यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, बेळगावात कुठे दंगल झाली ते सांगा असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. भाजपच जातीयवाद निर्माण करून जाती-धर्मात तेढ निर्माण करत आहे. पण लोक आता शहाणे झाले आहेत. मला हा प्रकार आवडत नाही. आपल्या देशात सर्व भाषा आणि धर्म एकत्र आहेत. भाजपने जातीयवादाऐवजी देशाच्या विकासाची चिंता करावी, असा सल्ला देत भाजपाला त्यांनी टोला लगावला.

बुडा कॉम्प्लेक्ससाठी निविदा मागवण्यात आली आहे. तांत्रिक अडथळे दूर करून कामाला सुरुवात करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेत बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, पुष्पा पर्वतराव आदी उपस्थित होते.

Tags: