Belagavi

बुडा अनुदानात प्रलंबित असलेल्या रामतीर्थनगरचा विकास पूर्ण करण्याची मागणी : स्थानिक रहिवाशांची आमदारांकडे मागणी

Share

बेळगाव शहर विकास प्राधिकरणाच्या अखत्यारीत येणाऱ्या कणबर्गीमध्ये गेल्या 27 वर्षांपासून न पाहिलेला विकास बुडा अनुदानातून करण्यात यावा, अशी मागणी रामतीर्थनगर येथील रहिवाशांनी आज बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांना निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

बुडा च्या अखत्यारीत येणाऱ्या कणबर्गी रामतीर्थ नगर मधील स्कीम नं. 35 43, 43 भागाचा विकास गेल्या २७ वर्षांपासून खुंटला आहे. या भागात ड्रेनेज, पिण्याच्या पाण्याचा पुरेसा पुरवठा, रस्ते विकास, उद्यानांचा विकास, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त अशा अनेक मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. मूलभूत आणि पायाभूत सुविधांअभावी येथील जनतेचे हाल होत असून या पार्श्वभूमीवर आज येथील नगरसेवक हणमंत कोंगाळी यांच्या नेतृत्वाखाली रामतीर्थनगर येथील रहिवाशांनी आजच्या बुडा सभेत चर्चा करून हा प्रश्न सोडविण्याचे निवेदन आमदार आसिफ सेठ यांना दिले.

निवेदन स्वीकारून आमदार आसिफ सेठ यांनी येथील समस्या सोडविण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. यासंदर्भात इन न्यूजशी बोलताना ते म्हणाले, कणबर्गी रामतीर्थ नगर येथील रहिवाशांनी दिलेल्या निवेदनाचा सकारात्मक पद्धतीने विचार करून लवकरच कणबर्गी येथील समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा केला जाईल.

यासंदर्भात नगरसेवक हणमंत कोंगाळी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, गेल्या २७ वर्षांपासून या भागाचा विकास झालेला नाही. हा भाग ५ वर्षात विकसित करून महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचा नियम असला तरी त्यातील केवळ ७० टक्केच विकास झाला आहे. ड्रेनेज, अंडरग्राउंड विद्युत तारा, रस्ते इतर पायाभूत सुविधांचा विकास प्रलंबित आहे. या भागाच्या विकासासाठी जाहीर झालेला निधी इतरत्र खर्च करण्याऐवजी रामतीर्थनगरच्या विकासासाठी वापरून ते त्यानंतरच हा भाग महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात यावा, अशी सूचना त्यांनी केली.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुरेश यादव यांच्यासह रामतीर्थनगर रहिवासी संघटनेचे सदस्य सहभागी झाले होते.

Tags: