Belagavi

अखेर महापालिकेकडून मूळ मालकाला जागा सुपूर्द

Share

बेळगाव महानगरपालिकेच्या 20 कोटी रुपयांच्या दंड प्रकरणासंदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर , महापालिकेने आज ज्या जमिनीवर रस्ता बांधला होता ती जागा मूळ मालकाला परत केली.

बेळगावातील श्यामाप्रसाद मुखर्जी रोडवरील शिवचरित्राच्या शेजारी बाळासाहेब पाटील यांच्या मालकीची इमारत पाडून त्या ठिकाणी रस्ता बांधण्यात आला. मात्र त्या जागेची भरपाई त्यांना देण्यात आलेली नाही . महापालिकेच्या आणि स्मार्टसिटीच्या या धोरणाविरोधात ते उच्च न्यायालयात गेले होते. हायकोर्टाने ही प्रक्रियाही बेकायदेशीर असल्याचा निकाल देत जमिनीच्या मालकाला २० कोटी रुपयांची भरपाई देण्याचा आदेश महापालिकेला दिला होता . यावर बेळगाव महापालिकेने विशेष परिषद बैठकही घेतली.

परंतु आज माननिय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बेळगाव महानगरपालिकेचे आयुक्त, स्मार्ट सिटीचे एमडी, बेळगाव उपविभागीय अधिकारी यांनी सदर जमीन मूळ मालक बाळासाहेब पाटील यांच्याकडे सुपूर्द करून न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी बॅरिकेड्स लावण्यात आले असून वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे.

ज्या जमिनीवर रस्ता बांधला ती परत मिळणार की 20 कोटींची भरपाई? असा सवाल न्यायालयाने केला. यावरही परिषदेच्या बैठकीत चर्चा झाली. मात्र अखेर जमीन मालकांचे वकील व महापालिका अधिकाऱ्यांनी परस्परांना जमीन परत देण्याचे मान्य केल्याने आज जमीन परत देण्यात आली आहे. मात्र, महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या या धोरणाबाबत नगरसेवकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. 20 कोटींच्या दंडाप्रकरणी दोषी कोण आहेत हे शोधून त्यांना शिक्षा झाली पाहिजे. अधिकाऱ्यांच्या पगारातून दंड भरावा, असे नगर सेवक शंकर पाटील यांनी सांगितले.

Tags: