राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असून, अल्पसंख्याकांच्या तुष्टीकरणाच्या धोरणामुळे हे प्रकार घडत असल्याचे सांगत खासदार जगदीश शेट्टर यांनी काँग्रेस सरकारवर हल्लाबोल केला. अल्पसंख्याकांच्या तुष्टीकरणामुळे राज्यात पॅलेस्टाईन आणि पाकिस्तानचा झेंडा फडकत आहे. अल्पसंख्याकांच्या तुष्टीकरणाच्या धोरणामुळे असे प्रकार घडत आहेत, अशी प्रतिक्रिया खासदार जगदीश शेट्टर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केली.
दावणगेरे आणि नागमंगल दंगल भडकवणाऱ्यांना आणि दगडफेक करून नुकसान करणाऱ्यांना संरक्षण देण्याचे काम काँग्रेस सरकार करत असल्याचा संताप खासदार जगदीश शेट्टर यांनी व्यक्त केला.
तिरुपतीमध्ये प्रसादाच्या स्वरूपात देण्यात येत असलेल्या लाडूमध्ये प्राण्यांच्या चरबीचे तेल सापडल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे. माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. यामुळे समस्त हिंदू धर्माचा अपमान झाला. लाडू प्रसाद प्रकरणी होत असलेल्या आरोपांचा योग्य तपास व्हावा, आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
मुडा घोटाळा समोर आल्यानंतर काँग्रेस सरकारकडून द्वेषाचे राजकारण वाढले आहे. द्वेषाचे राजकारण वाढले आहे, येडियुरप्पा आणि कुमारस्वामी यांना डिनोटिफिकेशनसाठी ६ वर्षे लागली, असे म्हणत मुख्यमंत्री सिध्दरामय्यांवर त्यांनी टीका केली. वंदे भारत रेल्वे बेळगाव साठी सुरु करण्यात यावी, तसेच धारवाड ते बेळगाव सेवा सुरु करण्यात यावी याबाबत केंद्रीय रेल्वेमंत्र्यांशी चर्चा झाली असून, 23 सप्टेंबर रोजी राज्याचे रेल्वेमंत्री व्ही. सोमन्ना हुबळी येथे येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
एक देश, एक निवडणूक घेण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, विधानसभा, लोकसभा इ.च्या निवडणुका कधीतरी होतात तेव्हा आचारसंहिता लागू होते. त्यामुळे कामे लांबणीवर पडत असून शासनाला कोणताही प्रकल्प नीट राबवता येत नाही. नवीन उपाययोजना करून हा प्रश्न सुटणार असल्याचे त्यांनी सांगितले.


Recent Comments