लाखो भाविकांना उत्साह देणार्या यंदाच्या सार्वजनिक गणपतींची विसर्जन मिरवणूक तब्बल २४ तासांहून अधिक काळ सुरु होती. गेल्या ११ दिवसांपासून सुरु असलेल्या गणेशोत्सवाची जल्लोषात सांगता करण्यात आली.
हजारो गणेशभक्तांच्या उपस्थितीत मंगळवारी गणरायाला निरोप देण्यात आला. शहापूर, कपिलेश्वर तलाव, जक्केरी हुंड, अनगोळ तलाव, किल्ला तलाव यासारख्या अनेक ठिकाणी घरगुती आणि सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. गणपती बाप्पा मोरया , पुढच्या वर्षी लवकर या च्या गजरात गणरायाला निरोप देण्यात आला. मिरवणूक मार्गावर तरुण तरुणींसह आबालवृद्धांनी रात्रभर जागून उपस्थिती दर्शविली. पुणे – मुंबई नंतर मोठ्या प्रमाणात बेळगावमध्ये साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवासाठी बेळगावसह गोवा, महाराष्ट्र आणि कोकण भागातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
विविध गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींसमोर पारंपरिक वेशभूषेतील गणेशभक्तांचा सहभाग, कलापथके, झांज, लेझीम, ढोल – ताशा पथकांचा सहभाग होता. विसर्जन मिरवणुकीदरम्यान जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यासपीठावर बसून मिरवणूक पहिली.

बेळगाव महानगरपालिका व्याप्तीसह उपनगरातील विविध गणेशमूर्तींनीही विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला होता. तब्ब्ल ३९० गणेशमूर्तींचा सहभाग, हजारो गणेशभक्त, कलापथकांचे सादरीकरण यामुळे संपूर्ण मिरवणूक लक्षवेधी ठरली. बहुतांश गणेशोत्सव मंडळांनी १२ फुटापेक्षा अधिक मूर्ती साकारल्या होत्या. या मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी पालिका प्रशासनाच्या वतीने क्रेनची व्यवस्था करण्यात आली होती. शहरातील काही तुरळक घटना वगळता संपूर्ण मिरवणूक शांततेत आणि सुरळीत पार पडली. मात्र यंदाही डॉल्बीमुक्त विसर्जन मिरवणुकीला फाटा देत अनेक गणेशोत्सव मंडळांनी डॉल्बी आणि लेझर लाईटचा वापर केल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. शिवाय यंदाही गणेश विसर्जन मिरवणूक नियोजनाअभावी लांबल्यानेही नाराजी व्यक्त होत आहे.


Recent Comments