गणेशोत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बेळगाव जिल्हा प्रशासन आणि शहर पोलीस विभागाने करडी नजर ठेवली असली, तरी बेळगावात पहाटेच्या सुमारास तीन तरुणांवर अनोळखी व्यक्तीने चाकूहल्ला केल्याची घटना घडली आहे.
कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे काल रात्री श्री गणेश विसर्जन मिरवणुकीप्रसंगी क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणाचे पर्यवसन मोठ्या वादात होऊन तिघा युवकांवर चाकू हल्ला करण्यात आला आहे. मिरवणुकीत डान्स करताना क्षुल्लक कारणावरून हा वाद झाल्याचे समजते. सदर विद्यार्थी हे वसतिगृहातील असून त्यांच्या पोटावर, मानेवर व पाठीवर वार करण्यात आले आहेत. बेळगावातील चर्च गल्लीतील तरुणांच्या टोळीने हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे.
या घटनेत दर्शन पाटील, नितीश पुजारी आणि प्रवीण गुंड्यागोळ नामक तीन युवक गंभीर जखमी झाले असून, प्रवीण गुंड्यागोळ या तरुणावर खासगी रुग्णालयात तर दर्शन पाटील आणि सतीश पुजारी यांच्यावर बिम्समध्ये उपचार सुरू आहेत.
हल्ल्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या तीन आरोपींना एपीएमसी पोलिसांनी पाठलाग करून पकडले आहे. सीपीआय विश्वनाथ कब्बूर आणि कर्मचाऱ्यांनी दुचाकीवरून पळून जाणाऱ्या तीन आरोपींना विश्वेश्वरय्या नगर येथे पकडले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी सुरु असून या घटनेचा तपास पोलीस घेत आहेत. एपीएमसी पोलीस स्थानकाच्या पोलीस अधिकाऱ्यांनी सिव्हिल हॉस्पिटलला भेट देऊन पुढील तपास सुरु केला असून या घटनेप्रकरणी एपीएमसी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला आहे.
बेळगाव शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन यांनी या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले, गणपती मिरवणुकीत नाचताना पायाला मार बसल्यानंतर क्षुल्लक कारणावरून सुरु झालेल्या वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले. या घटनेतील तीन जखमी व्यक्तींवर बिम्स रुग्णालयात उपचार सुरु असून वैयक्तिक कारणावरून हा हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. आरोपींनी गांजाच्या नशेत कृत्य केल्याचा आरोप देखील होत असून याप्रकरणी आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.


Recent Comments