Belagavi

सीमावर्ती भागातील शेतकऱ्यांना बारमाही पाणी मिळणार : दोन्ही राज्याच्या आमदार – खासदारांची बैठक

Share

बेळगाव आणि कोल्हापूर या सीमावर्ती जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी महाराष्ट्र सरकारने कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर अतिरिक्त जलसाठे बांधण्याचा निर्णय बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर आणि कोल्हापूरचे आमदार राजेश पाटील यांच्यात झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. या नवीन जलाशयांमुळे सीमेवर 12 महिने पाणी उपलब्ध होणार आहे.

सीमावर्ती भागात जलाशय बांधण्यासंदर्भात बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर आणि कोल्हापूर जिल्ह्याचे चंदगडचे आमदार राजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बेळगाव सर्किट हाऊसमध्ये महत्त्वपूर्ण बैठक झाली. तिलारी जलाशयाजवळ आणखी एक जलाशय बांधल्यास त्याचा फायदा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना होणार आहे. मार्कंडेय नदीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनाही यामुळे मदत होणार आहे. तिलारीजवळ भांडुरा, देवल नाला आणि पाळेपुरमार हे तीन जलाशय बांधले जात आहेत. किटवडे जलाशय तयार झाल्यास महाराष्ट्रातील गडहिंग्लज आणि कर्नाटकातील संकेश्वरला 12 महिने पाणी मिळेल.

याआधीही माजी नगर सेवकांनी प्राथमिक चर्चा केली होती. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी पुन्हा एकदा ही बैठक झाली. वीज निर्मितीसाठी देखील या पाण्याचा वापर होऊ शकतो. परंतु याचा लाभ शेतकऱ्यांना मिळणे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र – कर्नाटकातील शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होऊ शकतो. यासाठी 3 टीएमसी पाण्याची महाराष्ट्राला गरज आहे. देशाचा कणा असलेला शेतकरी समृद्ध झाला तरच देशाचा विकास शक्य आहे. याबाबत लवकरच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे आमदार राजेश पाटील यांनी सांगितले.

तसेच माजी आमदार अनिल बेनके, विधान परिषदेचे माजी सदस्य महांतेश कवटगीमठ, माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनीही माहिती दिली. यावर लवकरच निश्चितपणे दखल घेतली जाईल. त्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली जाईल. खासदार जगदीश शेट्टर यांनी दोन्ही सरकारने मान्यता दिल्यास लवकरच कामाला सुरुवात केली जाईल, असे आश्वासन दिले.

बैठकीला कोल्हापूर पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता ए.एस. मैत्री, अविनाश फडतरे, स्वाती उरणकर आदींचा सहभाग होता.

Tags: