Banglore

मंड्या येथील गणेश विसर्जन मिरवणुकीत झालेल्या घटनेचे राजकारण करू नका : गृहमंत्री

Share

नागमंगल येथील गणेश मिरवणुकीत दगडफेक झाल्याप्रकरणी ५२ जणांना अटक करण्यात आली असून येथील परिस्थिती आता नियंत्रणात आहे, या घटनेचे राजकारण करू नका हि जातीय दंगल नाही, असे स्पष्टीकरण गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी दिले आहे.

बंगळुरूमध्ये माध्यमांशी बोलताना गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर म्हणाले की, काल नागमंगलमध्ये घडलेल्या घटनेनंतर तेथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक, आयजीपी, केएसआरपीचा ताफा घटनास्थळी दाखल झाला आहे. कायदा व सुव्यवस्था एडीजीपी घटनास्थळी पाठवण्यात आले आहेत. या घटनेला जातीय दंगल म्हणता येणार नाही. हि घटना पोलिसांनी हाताळली असून याला राजकीय किंवा जातीय रंग देऊ नका अशी विनंती त्यांनी केली.

या घटनेत फारसे लोक जखमी झाले नाहीत. दंगलीप्रकरणी दोन गटातील एकूण 52 जणांना अटक करण्यात आली आहे. घटनेची दृश्ये सीसी कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. त्याआधारे आम्ही दगडफेक करणाऱ्यांवर आणि जाळपोळ करणाऱ्यांवर कारवाई करू. यादरम्यान पोलीस देखील जखमी झाले असून कोणताही राजकीय हेतू या घटनेमागे नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी गृहमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी केलेल्या वक्तव्यावरदेखील प्रतिक्रिया देत कुमारस्वामींनी या आधीच्या घटनांवर कशी प्रतिक्रिया दिली आहे हे आपल्याला माहिती असल्याचे सांगत त्यांना फटकारले.

या घटनेमागे कोणतेही राजकारण नाही. या घटनेचा तपास पोलिसांकडे सोडल्यास ते कायदेशीर कारवाई करतील. अशा घटनेत कायदेशीर सल्ला स्वागतार्ह आहे. यामध्ये कोण कोण सामील आहे याची माहिती अधिकाऱ्यांकडून घेणार असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले.

Tags: