गोवावेस येथील महावीर भवन येथे 28 व 29 सप्टेंबर रोजी सतीश जारकीहोळी खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ही राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा असल्याने विविध राज्यातून स्पर्धक येणार आहेत अशी माहिती सतीश फॅन्स क्लबचे अध्यक्ष इम्रान तपकीर यांनी दिली.
बेळगावमधील गेस्ट हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, सतीश जारकीहोळी खुली बुद्धिबळ स्पर्धा गेल्या दोन वर्षांपासून बेळगाव येथे आयोजित केली जात आहे. या वर्षी 28 व २९ सप्टेंबर पासून दोन दिवस स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून स्पर्धकांसाठी भोजन व राहण्याची सोय करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि गोव्यासह विविध राज्यांतून स्पर्धक येणार असून १००० रुपये प्रवेश शुल्क निश्चित करण्यात आला आहे. तर १६ वर्षांखालील स्पर्धकांसाठी ८०० रुपये प्रवेश शुल्क निश्चित करण्यात आले आहे.
मंत्री सतीश जारकीहोळी हे खेळाला खूप प्रोत्साहन देत आहेत आणि विविध खेळात सहभागी होणाऱ्या मुलांना मदत देखील करतात. या स्पर्धेत हजारो स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. या स्पर्धेसाठी एकूण 3.5 लाख रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली असून आकर्षक रोख रक्कम, ट्रॉफी देऊन विजेत्या स्पर्धकांना गौरविण्यात येणार आहे. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना सन्मानपत्र देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
बेळगाव बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष बसवराज बागेवाडी म्हणाले की, सतीश जारकीहोळी फाऊंडेशनच्यावतीने हुशार मुलांची ओळख करून त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सुरू आहे. इच्छुकांनी खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत भाग घेऊन आकर्षक पारितोषिके पटकावावीत असे आवाहन त्यांनी केले. दिक्षा पुजारी म्हणाल्या की, सतीश जारकीहोळी फाऊंडेशनतर्फे तरुण-तरुणींना प्रोत्साहन देण्यासाठी अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याच अनुषंगाने सतीश जारकीहोळी खुली बुद्धिबळ स्पर्धा आयोजिण्यात आली असून या स्पर्धेमुळे मुलांच्या ज्ञानात भर पडेल. या स्पर्धेत सहभागी होऊन बुद्धिबळ पटूनि लाभ घ्यावा, असे त्या म्हणाल्या.
यावेळी निकिता तरडे, प्रशांत अन्वेकर, आकाश मडीवाळ, अजय धामणेकर, अकबर सर्डेकर, शानवाज किल्लेदार आदी उपस्थित होते.


Recent Comments