Dharwad

केंद्र सरकार लवकरच कोसळणार : मंत्री संतोष लाड

Share

माजी मंत्री सी.टी.रवी यांच्या राज्य सरकार कोसळण्याच्या वक्तव्यावर मंत्री संतोष लाड यांनी जोरदार प्रहार करत राज्य सरकार नाही तर केंद्र सरकार लवकरच कोसळणार आहे, असा दावा केला आहे.

राज्यातील सरकार कोसळेल या वक्तव्याशिवाय भाजपाकडे दुसऱ्या कोणत्याच गोष्टी नाहीत. मात्र राज्य सरकार नाही तर विविध राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर केंद्र सरकारच कोसळणार आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री संतोष लाड यांनी व्यक्त केली आहे.

ते पुढे म्हणाले, भाजप सरकारच्या काळात झालेल्या घोटाळ्यांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून य समितीमध्ये मीदेखील आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली समितीत चर्चा होणार असून दोन महिन्यांत चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

डी. के. शिवकुमार यांनी अमेरिकेच्या दौऱ्यावर असणाऱ्या राहुल गांधींची भेट घेतली याप्रकरणी प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, त्या दोघांची भेट झाली हि आनंदाची बाब आहे. मात्र यादरम्यान उभयतात राज्याच्या राजकारणावर कोणतीही चर्चा झालेली नाही. याच विषयावर पुन्हा पुन्हा प्रश्न विचारू नका असेही त्यांनी सुचवले.

आगामी काळात जम्मू काश्मीर, हरियाणा आणि महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मोदींचे सरकार पडणार असून सर्वेक्षण अहवालात भाजपचा पराभव होणार असल्याचे पुढे आल्याचेही ते म्हणाले. राज्यात आमचे १३६ आमदार आहेत. यामुळे पाच वर्षात आमचेच सरकार राहील, असा विश्वास मंत्री लाड यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री बदलासंदर्भात प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, पक्षाचे सर्व आमदार, कॅबिनेट मंत्री सिध्दरामय्यांच्या बाजूने आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री बदलणार नाहीत, याच विषयावर वारंवार प्रश्न विचारू नका, असे पत्रकारांना सुचवत भाजप जर या विषयावर बोलत असेल तर त्यांना बोलू द्या. असेही ते म्हणाले.

Tags: