Belagavi

हुबळी-पुणे ‘वंदे भारत’ची चाचणी सुरू

Share

हुबळी-पुणे दरम्यान ‘वंदे भारत’ रेल्वे धावण्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. हुबळीहून बेळगावला आलेल्या वंदे भारत रेल्वेचे आज बेळगावमध्ये भव्य स्वागत करण्यात आले.

हुबळी-मिरज-हुबळी या मार्गावर वंदे भारत चाचणी घेतली जात असून रविवार दि. 15 रोजी हुबळी-पुणे मार्गावर वंदे भारत धावणार हे निश्चित झाले आहे. गुरुवारी सकाळी 10.30 वाजता हुबळी रेल्वे स्थानकातून वंदे भारत सुटून दुपारी 12.20 वाजता बेळगावला आणि पुन्हा ३ वाजता मिरज येथे पोहोचली तर परतीच्या प्रवासात दुपारी 3.30 वाजता मिरज येथून निघालेली एक्स्प्रेस सायंकाळी 5.30 वाजता बेळगावला तर रात्री 7.50 वाजता हुबळीला पोहोचली.

रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वंदे भारत एक्स्प्रेसचे उद्घाटन करणार आहेत. हुबळी रेल्वे स्थानकात केशरी रंगातील नवीन वंदे भारत दाखल झाल्याने प्रवाशांमध्ये वंदे भारतबाबत प्रचंड उत्सुकता आहे. गुरुवारी केवळ चाचणी होणार असल्याने कोणालाही वंदे भारतमध्ये प्रवेश दिला गेला नाही. मात्र अधिकृत उद्घाटनानंतर बेळगावकरांना या रेल्वेचा लाभ घेता येणार असल्याने बेळगावकरांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

Tags: