राज्य सरकारने अनुसूचित जातीतील पोटजातींना अंतर्गत आरक्षण द्यावे, या मागणीसाठी कर्नाटक राज्य दलित संघटनांनी बेळगावमध्ये आंदोलन केले.
कर्नाटक राज्य दलित संघटनेने अनुसूचित जातीतील पोटजातींना आरक्षण मिळावे या मागणीसाठी भव्य निषेध रॅली काढली, बेळगाव मधील डॉ. बी.आर. आंबेडकर उद्यानात अभिवादन करून निषेध रॅलीला सुरुवात करण्यात आली. यानंतर चन्नम्मा सर्कल येथे मानवी साखळी करून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
कर्नाटक राज्य दलित समाजाच्या कमलम्मा बोलताना म्हणाल्या, मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे अहिंद नेते आहेत. राज्य सरकार सत्तेत येऊन १ वर्ष उलटले तरीही मादिग समाजाला आरक्षण देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे.

राज्य समन्वयक गुरुमूर्ती बोलताना म्हणाले, 30 वर्षांपासून आम्ही आमच्या सामाजिक न्यायासाठी लढा देत आहोत, मात्र आम्हाला न्याय मिळाला नाही, आता सर्वोच्च न्यायालयाने अंतर्गत आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचे आदेश देऊनही अहिंद समाजाचे मुख्यमंत्री दलितांच्या बाजूने उभे आहेत का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आज आम्ही जिल्हास्तरावर आंदोलन छेडले असून भविष्यात राज्यपातळीवर आंदोलन करून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी घेराव घालू असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी दलित नेते प्रशांत राव, रमेश मादार, राज्य अल्पसंख्याक संघाचे अध्यक्ष रफिका बोकरे, राज्य महिला समन्वयक कमलव्वा कऱेम्मनवर, बसवराज काडापूर, यमनाप्पा करबनावर, सत्तेप्पा करवाडे, रवी कडकोळ, बसवराज मेस्त्री आदींसह मादिग समाजाचे नेते, कार्यकर्ते आणि महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.


Recent Comments