राज्यात मुख्यमंत्री बदल करण्याबाबत चर्चा होत असून मुख्यमंत्रीपदाची कोणतीही जागा रिक्त नाही, मुख्यमंत्रीपदी मीच कायम राहणार आहे, असे स्पष्टीकरण खुद्द मुख्यमंत्री सिध्दरामय्यांनीच दिले आहे.
बेंगळुरूमध्ये माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, भाजप सरकारच्या काळातील घोटाळ्यांबाबत तपास आणि समन्वयाच्या प्रगतीसाठी गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिस्तरीय उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. मंत्री कृष्णा भैरेगौडा, प्रियांक खर्गे, संतोष लाड आणि एच के पाटील हे या समितीचे सदस्य आहेत. समितीला अहवाल सादर करण्यासाठी एक ते दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.
चौकशी आयोग पीएसआय घोटाळा, 40% कमिशन घोटाळा, कोविड 19, बिटकॉइन घोटाळ्यांसाठी स्थापन करण्यात आला आहे. चौकशी आयोगाने कोविड-19 बाबत प्राथमिक अहवाल दिला असून, अधिकाऱ्यांच्या आढाव्यानंतर मंत्रिमंडळात याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
भाजपच्या आरोपांना उत्तर देताना भाजप माझ्याविरोधात द्वेषाचे राजकारण करत आहे. आमचे सरकार द्वेषाचे राजकारण करत नाही. मात्र चुकीचे काम करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले. न्यायमूर्ती बी. वीरप्पा आयोगाने पीएसआय घोटाळ्याच्या तपासाबाबतचा अहवाल जारी केला असून कारवाई होत नसल्याबद्दल माध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, या घोटाळ्यावर विशेष तपास पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
वाल्मिकी घोटाळ्याबाबत एसआयटी आणि केंद्रीय अंमलबजावणी संचालनालयाच्या तपासावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, एसआयटीनेही या प्रकरणाचा तपास करून आरोपपत्र दाखल केले असून, न्यायालय या प्रकरणाचा निर्णय घेईल.
मुख्यमंत्रिपद रिक्त नसताना अन्य मंत्र्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या वक्तव्यावर भाष्य करताना ते म्हणाले, हा प्रश्नच उद्भवत नाही. सिद्धरामय्या स्वत: मुख्यमंत्रीपदी कायम राहतील, असे सांगत आपल्या मुख्यमंत्रीपदावर त्यांनी पुढील कालावधीसाठीही शिक्कामोर्तब केले आहे.


Recent Comments