Athani

मंत्री सतीश जारकीहोळी मुख्यमंत्रीपदासाठी ‘ओके’! : आम. सवदी

Share

बेळगाव जिल्ह्यातील मुख्यमंत्रीपदाच्या इच्छुकाला माझा पाठिंबा असेल, मंत्री सतीश जारकीहोळी मुख्यमंत्री झाले तर मी त्यांना पाठिंबा देईन, अशी प्रतिक्रिया अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी यांनी व्यक्त केली आहे.

बेळगाव जिल्ह्यातील आमदार मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, मंत्री सतीश जारकीहोळी यांच्यासह जिल्ह्यातील आणखी एका नेत्याला मुख्यमंत्रीपदासाठी माझा पाठिंबा असेल. पुढे जाण्यासाठी प्रत्येकाला शक्तीची गरज आहे. यापूर्वी संन्यासी राजकारणात येत नव्हते मात्र आता संन्यासी देखील राजकारणात उतरत असल्याची खोचक टीकाही त्यांनी केली.

आम. सवदी पुढे म्हणाले, माझ्याकडे अनुदानाची कमतरता नाही, दीड वर्षात 2 हजार कोटी अनुदान मिळाले आहे. या भागात मी आवश्यक कामे हाती घेतली असून मतदार संगःच्या विकासाला प्राधान्य दिले आहे.

आमदार लक्ष्मण सवदी म्हणाले की, मुडा प्रकरण 20 वर्षांपूर्वी घडले होते, मुडा प्रकरणात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कोणतीही मागणी केली नाही, कोणतेही आदेश दिले नाहीत, पत्नीसाठी जागेसाठी अर्ज केला नाही, हि जागा त्यांच्या नातेवाईकांना भेटीदाखल दिल्याचे आम. सवदी म्हणाले.

सवदी यांना आतापर्यंत मंत्रिपद मिळायला हवे होते, या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, “मी याआधीही अनेक जबाबदार खाती सांभाळली आहेत, मी याआधी राज्याचा उपमुख्यमंत्री देखील झालो आहे, आता पुन्हा नव्याने मंत्री होण्याची माझी इच्छा नाही. परंतु भविष्यात एखादी चांगली संधी मिळाली तर आपण विचार करू असे ते म्हणाले.

Tags: