Belagavi

121 गणेशमूर्ती साकारून विक्रम बनविलेले मूर्तिकार : एम. जे पाटील

Share

श्रीगणेशाच्या आगमनासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना मूर्तीकार गणेशमूर्तींवर शेवटचा हात फिरवताना दिसत आहे. युद्धपातळीवर गणेश मूर्ती तयार करण्याचे काम सुरु असून बेळगावमधील मुतगा या गावातील मूर्तिकार एम. जे . पाटील यांनी तब्बल १२१ गणेश मूर्ती बनवून विक्रम केला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर इन न्यूजने घेतलेला विशेष आढावा पाहुयात या विशेष रिपोर्टमधून….

येत्या दोन दिवसात श्री गणेश चतुर्थी साजरी केली जाणार असून गल्लोगल्ली, घरोघरी श्री गणेश विराजमान होणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र जोरदार तयारी सुरु असून मूर्तिकारांचे काम देखील अंतिम टप्प्यात आले आहे.

बेळगाव शहरात आणि परिसरात आकर्षक गणेशमूर्ती बनवणारे मूर्तिकार आहेत. बेळगाव तालुक्यातील मुतगा गावातील कलाकार एम.जे. पाटील या मुर्तीकाराने यंदा १२१ गणेश मूर्ती साकारल्या असून त्यांनी तयार केलेल्या मूर्तीना बेळगावातच नाही तर महाराष्ट्र, गोवा आणि आंध्र प्रदेशातही मोठी मागणी आहे. मुतगा गावातील कलाकार एम.जे. पाटील यांनी बेळगाव शहर परिसरासाठी 25 गणेशमूर्ती तयार केल्या आहेत याचप्रमाणे महाराष्ट्र, इचलकरंजी, सांगली, मिरज, कोल्हापूर, आंध्र प्रदेश आदी भागातील गणेशोत्सव मंडळांसाठी मूर्ती बनवल्या आहेत.

आजोबा आणि वडिलांच्या प्रेरणेने एम.जे.पाटील लहानपणापासूनच मूर्ती बनवायला शिकले. गेल्या 20-25 वर्षांपासून ते विविध प्रकारच्या सुंदर गणेशमूर्ती बनवत आहेत, त्यांनी साकारलेल्या गणेश मूर्तींना बेळगावसह महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेशात मागणी आहे. पर्यावरण प्रदूषण रोखण्यासाठी सरकारने पीओपी गणेशमूर्तींवर बंदी घातली आहे. मात्र, मातीच्या अवाढव्य गणेशमूर्ती तयार करणे अवघड आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्याचा सराव सुरू असून पुढील वर्षापासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मूर्तिकार एम.जे.पाटील यांनी सांगितले.

Tags: