कागवाड – कलादगी राज्य महामार्ग विभागातील कागवाड – उगार मध्यवर्ती भागातील ९ किलोमीटर रस्त्याच्या विकासकामांचा शुभारंभ काग्वाडचे आमदार राजू कागे यांच्याहस्ते करण्यात आला.
मंगळवारी शेडाबाळ बसस्थानकाजवळ रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार राजू कागे म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून कागवाड ते उगार दरम्यान रस्ता तयार करण्याची जनतेकडून मागणी होत होती. सुप्रसिद्ध सह्याद्री कंपनीला या रस्त्याचे कंत्राट देण्यात आले असून यासाठी ३० कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. रस्त्याचे कामकाज दर्जेदार व्हावे यासाठी कंत्राटदारांना सूचना करण्यात आल्या असून याकडे लोकप्रतिनिधी आणि जनतेनेही लक्ष द्यावे असे आवाहन त्यांनी केले.
काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यापासून कोणतेही चांगले काम झाले नसल्याचा आरोप विरोधी पक्ष करत आहेत. पण 30 कोटी रु. खर्च करून रस्त्याचे काम हाती घेण्यात आले असून 11 कोटी रुपये खर्चून ऐनापूर येथे शुद्ध पेयजल प्रकल्पाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. याशिवाय अनेक विकासकामे देखील केली आहेत. विरोधी पक्ष बिनबुडाचे आरोप करत असल्याचा पलटवार त्यांनी केला.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता दयानंद हिरेमठ व सहाय्यक अभियंता एम.एस.मगदुम यांनी जनतेला कामाची माहिती दिली. सह्याद्री कन्स्ट्रक्शन कंपनीचे प्रतिनिधी सागर सलगरे यांनी आमदारांचा सत्कार केला.
समारंभात सन्मती शिक्षण समितीचे अध्यक्ष विनोद बरगळे, भरतेश नांद्रे, कुमार पाटील, प्रकाश माळी, नेमिनाथ घेणापगोळ, वीरभद्र कटगेरी, राहुल कटगेरी, डॉ. राजू पाटील, नजीर मुल्ला, चेतना नांद्रे, बी.ए.गणे, नगरपंचायतीचे सदस्य व शेडबाळा, कागवाड, उगार गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
Recent Comments