Dharwad

अंत्ययात्रेसाठीही अन्नीगेरी येथील नागरिकांची कसरत… आम. कोनरेड्डी यांच्या मतदार संघातील नागरिकांची परवड

Share

धारवाड जिल्ह्यातील अन्नीगेरी तालुक्यातील मज्जीगुड्ड येथील नागरिकांची अंत्ययात्रेला अक्षरशः कसरत होत आहे. आयुष्याचा शेवटचा प्रवास देखील खड्तरपणे करून इतरांचेही जीव धोक्यात घालून मृतदेह घेऊन जाण्याची वेळ येथील नागरिकांवर आली असून लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणाला येथील लोक शिव्याशाप देऊ लागले आहेत.

आमदार एन. एच. कोनरेड्डी यांच्या मतदार संघातील नागरिकांची अशा पद्धतीने परवड होत असून अंत्ययात्रेदरम्यान रस्त्याविना चिखलातून मार्ग काढत कसरत करत जाण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. आपल्या मतदारसंघात सुसज्ज रस्ते बांधले जात असल्याचा दावा करणारे आमदार एन. एच. कोनरेड्डी यांच्यापर्यंत या अंत्ययात्रेचा व्हिडीओ पोहोचविणे म्हणजे विकासकामांचा आरसा दाखवण्यासारखे कार्य आहे.

गेल्या २० ते २५ वर्षांपासून येथील नागरिकांची अशाच पद्धतीने दैना उडत असून पावसाळ्यात येथील नागरिकांना वाट काढून पुढे जाणे धोक्याचे बनते. अशातच अंत्यसंस्कारासाठी जाणे हि देखील धोकादायक बाब बनली असून खांद्यावरून मृतदेह उचलून चिखलातून मार्ग काढत स्मशानभूमीपर्यंत पोहोचणे म्हणजे जीवावर उदार होऊन काम करण्यासारखेच आहे.. या भागात एकाच्या मृत्यूनंतर काढण्यात आलेल्या अंत्ययात्रेदरम्यान एका जागरूक नागरिकाने येथील साऱ्या परिस्थितीचा आढावा प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी व्हिडीओ चित्रण केले असून आपल्या मतदार संघात कोट्यवधी रुपये खर्चून विकास केल्याचा टाहो फोडणाऱ्या लोकप्रतिनिधींनी अवश्य यातून बोध घ्यावा, इतकेच सुचवावेसे वाटते.

इन न्यूज ब्युरो, धारवाड

Tags: