Belagavi

बालगृहात वाढलेली मुले आयएएस-आयपीएस अधिकारी व्हावी : जि. पं. सीईओ राहुल शिंदे

Share

बालगृह कर्मचारी आणि स्वयंसेवी संस्थांनी बाल संगोपनासाठी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. बालगृहात वाढलेली मुले आयएएस-आयपीएस व्हावीत, अशी प्रतिक्रिया बेळगाव जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी व्यक्त केली.  बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महिला व बाल विकास विभाग, बाल संरक्षण संचालनालय, बेंगळुरू आणि महेश फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मिशन वात्सल्य योजना, बाल न्याय कायदा, दत्तक नियम, पोक्सो कायदा आणि बालविवाह या विषयावर तीन दिवसीय कार्यशाळेला आज प्रारंभ झाला.

महिला व बालविकास विभागाचे उपसंचालक नागराज एन. यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात परिविक्षाधीन अधिकारी दिनेशकुमार मीना, अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रुती एन.एस. व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी आण्णाप्पा हेगडे उपस्थित होते. बेळगाव जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन करून मनोगत व्यक्त केले.

यावेळी बोलताना ते म्हणाले, मुलांचे संगोपन हे मोठे कर्तव्य आहे. बालगृहातील मुलांच्या समस्या सोडविण्यासाठी अधिकारी सदैव तत्पर असतात. बालगृहात असलेली मुले आज उच्च पदावर आहेत याचे कारण त्यांना मिळालेला पाठिंबा आहे. बालगृह कर्मचारी आणि स्वयंसेवी संस्थांकडून मुलांच्या संगोपनासाठी सुरू असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. बालगृहात वाढलेली मुले आयएएस-आयपीएस व्हावीत, अशी प्रतिक्रिया राहुल शिंदे यांनी व्यक्त केली.

महेश फाउंडेशनचे संस्थापक महेश जाधव यांनी त्यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या तीन दिवसीय कार्यशाळेमुळे अनेक गोष्टी शिकता आल्याबद्दल आनंद व्यक्त केला. यावेळी बोलताना ते म्हणाले, मुलांचे संगोपन करणे ही केवळ मोठी जबाबदारीच नाही तर एक उदात्त कार्य देखील आहे. गेल्या 17 वर्षांपासून ते एचआयव्हीबाधित मुलांची काळजी घेत असून ही कार्यशाळा त्यांच्या कार्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पर्यवेक्षक अधिकारी दिनेशकुमार मीना यांनी महेश फाऊंडेशनच्या कार्याचे कौतुक केले. तीन दिवस आयोजित केलेल्या कार्यशाळेचा लाभ घेऊन बालकांच्या पोषणावर अधिक भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

या शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमास कार्यक्रम व्यवस्थापक सरिता हेगडे, कार्यक्रम अधिकारी निर्मला, बाल संरक्षण अधिकारी जे.बी. लोकेश यांच्यासह बेळगाव आणि कलबुर्गी विभागातील बाल संगोपन संस्थांचे अधीक्षक सहभागी झाले होते.

Tags: