Hukkeri

हुक्केरीतील पर्यावरणस्नेही पोलीस स्थानक

Share

अलीकडे वाढलेली गुन्हेगारी, गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांची वाढलेली जबाबदारी आणि यातून वेळ काढत पोलीस स्थानक परिसरात निर्माण करण्यात आलेला निसर्गरम्य अनुभूती देणारा परिसर.. असे चित्र बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी पोलीस स्थानक परिसरात दिसून येत आहे. या पोलीस स्थानकाच्या पर्यावरणप्रेमाविषयी इन न्यूजचे प्रतिनिधी राजू बागलकोटी यांनी घेतलेला विशेष आढावा पाहुयात या रिपोर्टमधून..

पोलीस हे जनतेचे रक्षण करण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था हाताळण्यासाठी कार्यरत असतात. परंतु आपल्या सेवेपलीकडे जाऊन अनेकवेळा माणुसकीच्या नात्याचे दर्शन पोलिसांनी घडविले आहे. आता याचबरोबर पर्यावरण रक्षणाचाही वसा पोलिसांनी घेतला असून याचे सचित्र आपल्याला हुक्केरी पोलीस स्थानक परिसरात पाहायला मिळते.

जनतेचे रक्षण करण्याबरोबरच पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्या हुक्केरी पोलीस स्थानकाच्या पोलिसांनी पोलीस स्थानक कार्यालयाच्या परिसरात हिरवेगार वातावरण निर्माण केले आहे. सुसज्ज पोलीस ठाणे, स्वच्छ परिसर, कार्यालयाबाहेर असणाऱ्या झाडांची राखली जाणारी निगा असे चित्र बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील यमकनमर्डी पोलीस स्थानकात पाहायला अमिळते.

यमकनमर्डी पोलीस ठाणे हे बेळगाव जिल्ह्यातील सर्वात वर्दळीचे पोलीस ठाणे आहे असे मानले जाते. मंत्री सतीश जारकीहोळी यांचा मतदारसंघ असणाऱ्या यमकनमर्डी भागात राष्ट्रीय महामार्गावर अनेक अपघातांची मालिका सुरु असते. इतकेच नाही तर येथील वाहतूक समस्येचा भर आणि गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविणे अशी एकंदर कामाची व्याप्ती हुक्केरी पोलीस स्थानकांतर्गत येते. मात्र पोलीस स्थानक आवारात ५५० हुन अधिक झाडांची लागवड करून पर्यावरणाचे रक्षण करण्याचे व्रत देखील येथील पोलिसांनी अंगिकारले आहे, हे येथील वातावरण पाहिल्यावर लक्षात येते.

पोलीस स्थानकाच्या आवारात लक्षवेधी उद्यान तयार करण्यात आले असून येथील रोपट्यांची, झाडांची निगा देखील पोलीस करत आहेत. या स्थानकाचे पोलीस निरीक्षक रमेश छायागोळ यांच्या पुढाकारातून पोलीस स्थानकाचा आवार निसर्गरम्य बनविण्यात आला आहे. पोलीस स्थानकात सीसीटीव्ही कॅमेरा, खिडक्यांमध्ये असणारे मनी प्लांट, शस्त्रास्त्र ठेवण्याची जागा, अधिकाऱ्यांचे दालन, कर्मचाऱ्यांसाठी विविध दलाने, संगणक कक्ष अशा प्रत्येक गोष्टींचे नियोजन उत्तमपद्धतीने पोलीस स्थानकात करण्यात आले आहे. हे पोलीस स्थानक आणि येथील अधिकारी आणि कर्मचारी हे जन्सनेही म्हणून परिचित आहेत.

यमकनमर्डी ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष महादेव पाटोळी यांनी पोलिसांच्या या कार्याचे कौतूक करत, यमकनमर्डी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी पर्यावरण प्रेमी म्हणून आपल्या दैनंदिन कामातून वेळ काढून पाचशेहून अधिक रोपे लावून आदर्श निर्माण केला असल्याचे ते म्हणाले. नागरिकांच्या समस्यांना प्रतिसाद देणारे सर्वच पोलीस कर्मचारी येथील जनतेच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाले असून पोलीस स्थानक परिसराचे वातावरण देखील त्यांनी पालटून टाकले आहे हि बाब कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले. ()

वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासोबतच पर्यावरणस्नेही म्हणून कार्यरत असणाऱ्या या पोलीस स्थानकाच्या सर्वच कर्मचाऱ्यांचे हे कार्य अनुकरणीय असे आहे.

राजू बागलकोटी, इन न्यूज, हुक्केरी..

Tags: