Vijayapura

कालवा फुटल्याने विजयपूरमधील शेतकरी संकटात

Share

विजयपूर जिल्ह्यातील शेतकरी गेल्या दोन वर्षांपासून दुष्काळाचा सामना करत असून यंदा चांगल्या पावसामुळे शेतपिके उत्तम येतील अशी अपेक्षा येथील शेतकरी करत होते. मात्र तिकोटा भागातील कालवा फुटल्याने शेतपिकांमध्ये पाणी शिरल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.

यंदा झालेल्या समाधानकारक पावसामुळे पिके हाताशी येतील या अपेक्षेत येथील शेतकरी होते. मात्र दोन वर्षांपासून कोरडा दुष्काळ आणि यंदा पावसाचे थैमान यामुळे शेतकऱ्यांना यंदाही नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. जून – जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्याने या भागातील पीक चांगले आले आहे. मात्र येथील कालवा फुटून शेतात पाणी शिरल्याने तिकोटा गावातील 30 एकर शेतजमिनीत पाणी शिरले आहे.

अनेक शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन पेरणी केली होती. मात्र गेल्या २० दिवसांपासून शेतजमिनीतील पाण्याचा निचरा न झाल्याने आलेली पिके सडू लागली आहेत. केबीजेएनएल कालव्यातून आलेल्या पाण्यामुळे तब्बल १५ शेतकऱ्यांच्या शेतजमिनींना फटका बसून पिकांचे नुकसान झाले असून सलग २० दिवस पाणी शेतातच राहिल्याने आलेली पिके देखील कुजण्याच्या मार्गावर आहेत.

सुमारे ३० एकर क्षेत्रात उगवलेला ऊस, ज्वारी, मका ही पिके देखील पाण्याखाली गेली असून केवळ दोन आठवड्यात हि पिके उत्तम पद्धतीने पोसवणारी होती. मात्र २० दिवस उलटूनही शेतातील पाण्याचा निचरा न झाल्याने पिके साडू लागली आहेत. ज्वारी पिकावर आधीच नुकसानीचे सावट पसरले असून ऊस पिके देखील सध्या धोक्यात आहेत. ज्या ज्या शेतजमिनीत पाणी शिरले आहे ती शेतजमीन पिकवणारे शेतकरी हे अल्पभूधारक आहेत. याच जमिनीत पीक घेण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आहे.

या गावातील मुदुकाप्पा हिप्परगी नावाच्या शेतकऱ्याने तांब्या-पितळेची भांडी विकून मक्याची लागवड केली आहे. आणखी एका शेतकऱ्याने ३० हजार रुपयांचे कर्ज घेऊन पीक उभे केले आहे. मात्र कालवा फुटून शेतजमिनीत शिरलेल्या पाण्यामुळे उभ्या पिकांची नासाडी झाली असून शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे. सदर बाब पाटबंधारे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली असून अधिकाऱ्यांनी मात्र गरज असेल तर शेतकऱ्यांनीच या कालव्याची दुरुस्ती करून घ्यावी, असे सुचविल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.

कालवा फुटून शेतजमिनीत शिरलेल्या पाण्यामुळे पिके धोक्यात तर आलीच आहेत परंतु कर्जाऊ रक्कम घेऊन पिकांची उभारणी केलेल्या शेतकऱ्यांनाही पिके वाया गेल्याने संकटाचा सामना करावा लागत आहे. हि बाब लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने गांभीर्याने घेऊन शेतकऱ्यांच्या समस्येचे निराकरण करावे, अशी मागणी होत आहे.

Tags: