election

शेडबाळ नगरपंचायतीच्या अध्यक्षपदी भाजपच्या उत्कर्ष पाटील यांची निवड

Share

कागवाड तालुक्यातील शेडबाळ नगरपंचायतीच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. अध्यक्षपदी भाजपच्या उत्कर्ष पाटील यांची तर उपाध्यक्षपदी रूपा होनकांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली, त्यांना माजी मंत्री श्रीमंत पाटील यांनी पाठिंबा दिला.

शेडबाळ नगरपंचायतीच्या सभागृहात मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदार राजेश बुर्ली यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. 16 सदस्यीय नगरपंचायतीमध्ये 12 भाजप, 2 काँग्रेस आणि 2 बिगर पक्षीय सदस्य निवडून आले आहेत. मात्र सर्व सदस्यांनी विश्वासाने अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडून पक्षभेद विसरून एकजूट दाखवली.

माजी मंत्री श्रीमंत पाटील, युवा नेते श्रीनिवास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक झाल्याचे नूतन अध्यक्ष उत्कर्ष पाटील यांनी सांगितले. शेडबाळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कोणताही भेदभाव न करता शेडबाळच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू अशी ग्वाही त्यांनी शेडबाळ येथील सर्व जनतेला व पक्षातील ज्येष्ठांना दिली.

निवडणूक अधिकारी तथा कागवाडचे तहसीलदार राजेश बुर्ली यांनी अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड करून त्यांना अधिकार सुपूर्द केले. शेडबाळ नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी साबन्ना पुजेरी यांनी नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षांचा सत्कार केला. नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षांना खुल्या वाहनात बसवून शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली.

शहरातील ज्येष्ठ नागरिक भरतेश पाटील, अश्वथ पाटील, सुनील पाटील, एम.ए.गणे, राजू नांद्रे, किरण यंदगौडा , नेमिनाथ नरस गौडा, चंदू जाधव, वसंत शिंदे, प्रवीण केंपवडे, विनायक शिंदे, मुद्दू मुल्ला, सचिन जगताप, राजू चौघुले, दिपक कांबळे आदी उपस्थित होते.

Tags: