डेंग्यू, मलेरिया यांसारखे संसर्गजन्य आजार पसरविणाऱ्या डासांचा नायनाट करण्यासाठी आरोग्य विभाग आणि बेंगळुरू महानगरपालिकेने वेगळे प्रयत्न सुरु केले असून डासांचे समूळ उच्चाटन करणाऱ्या नव्या ओव्ही ट्रॅप उपकरणांची अंमलबजावणी करण्यात आली आहे अशी माहिती आरोग्य मंत्री दिनेश गुंडूराव यांनी दिली.
आज बेंगळुरू येथील गोपाळपूरमध्ये या उपकरणांचा शुभारंभ आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, ओव्ही ट्रॅप हे जैव उपकरण आहे. हे उपकरण डासांना आकर्षित करून डासांचे समूळ उच्चाटन करते. बेंगळुरू महानगरपालिका आणि आरोग्य विभागाने डासांचे प्रमाण अधिक असलेल्या ठिकाणी हे यंत्र बसवून डेंग्यू नियंत्रणात आणण्याचे नियोजन केले आहे.
ते पुढे म्हणाले, डासांचा नायनाट करण्यासाठी प्रायोगिकपणे या उपकरणाचा वापर करण्यात येत असून या उपकरणाच्या माध्यमातून डासांचा नायनाट करण्यात येत आहे. यामुळे डेंग्यू, मलेरिया, झिका यांसारखे संसर्गजन्य आजारांवर नियंत्रण मिळवता येणे शक्य आहे. मुंबईतील धारावी झोपडपट्टी भागातही हा प्रयोग करण्यात आला आहे. तसाच एक प्रयोग बेंगळुरूमध्ये सुरू करण्यात आला आहे. याचे चांगले परिणाम दिसून आल्यास राज्यभरात ओव्ही ट्रॅप यंत्रे बसवण्यासाठी पावले उचलू, असे ते म्हणाले.
Recent Comments