बेळगाव जिल्ह्यातील कागवाड तालुक्यातील शिरगुप्पी गावातील मल्लिकार्जुन सभाभवन येथे तिसऱ्या राष्ट्रीय स्तरावरील कराटे स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आलेले गदग जिल्हा शारीरिक शिक्षण अधिकारी तथा राष्ट्रीय पुरस्कार विजेते शांताराम जुगळे म्हणाले की, शिरगुप्पी गावात राष्ट्रीय स्तरावरील कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे ही अभिमानाची बाब आहे. या स्पर्धेत 6 राज्यातील कराटे स्पर्धक सहभागी होत आहेत. कराटे हा खेळ शिकून मानसिक व शारीरिकदृष्ट्या बळकट होणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.
नंतर राष्ट्रीय कराटे अध्यक्ष मोहनकुमार राजपूत म्हणाले की, शिरगुप्पी गावात राष्ट्रीय स्तरावरील कराटे स्पर्धा अतिशय यशस्वीपणे सुरू आहे. कराटे हा स्वसंरक्षणासाठी उत्कृष्ट खेळ आहे. आपल्या मुलांना लहानपणापासूनच कराटेचे प्रशिक्षण दिल्यास ती मुले आयुष्यात यशस्वी होऊ शकतात, असेही पालकांना सांगितले.
त्यानंतर राणी चेन्नम्मा सेल्फ डिफेन्स अँड कराटे असोसिएशनचे अध्यक्ष राजू पाटील यांनी सांगितले की, या राष्ट्रीय स्तरावरील कराटे स्पर्धेत 6 राज्यातील सुमारे 310 कराटे खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत उत्तर प्रदेश, राजस्थान, आसाम, महाराष्ट्र, दिल्ली आणि गोवा येथील कराटे खेळाडूंनी सहभाग घेतल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात जुगुळ गावचे के.एस.एस. हायस्कुलचे मुख्याध्यापक मृत्युंजय हुगार, शिक्षण निरीक्षक लक्ष्मण तोरणगट्टी, शिवानंद हल्लीगौडर महावीर जिरगीहाळ मायाप्पा पुजारी, लक्ष्मण चौगला, तेजपाल उपाध्याय आदी उपस्थित होते.
Recent Comments