Belagavi

महापालिकेला कर भरत असूनदेखील पायाभूत सुविधांपासून वंचित : आम्ही स्मार्ट सिटी बेळगावात आहोत की अन्य कुठे???

Share

आम्ही बेळगाव महापालिकेला कर भरतो. मात्र,मूलभूत सुविधांपासून वंचित आहोत . आम्ही बेळगाव स्मार्ट सिटीमध्ये राहतो की अन्य भागात, हेच कळेनासे झाले आहे . आम्हाला मूलभूत सुविधा पुरवा अशी मागणी बेळगावच्या टिळकवाडी आणि मंडोळी रस्त्यालगत असलेल्या वीर सावरकर कॉलनीतील रहिवासी करत आहेत.

20-25 वर्षांपूर्वी बेळगाव मधील टिळकवाडी, मंडोली रोडला लागून असलेल्या वीर सावरकर कॉलनीत घरे बांधलेले लोक आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. हे लोक महानगर पालिकेला कर भरतात, पण त्यांना रात्रीच्या वेळी पथदिवे, रस्ता, पिण्याचे पाणी मिळत नाही. तसेच महानगर पालिकेचे कचरा उचल करणारे वाहनही त्याच्या भागात येत नाही. लहान मुले व वृद्धांना याचा मोठा त्रास होत आहे. बसची व्यवस्थाही नाही. खराब कच्च्या रस्त्यावरून वाहने चालवणेही अवघड झाले आहे, ही समस्या संबंधितांनी लवकर सोडवावी, अशी मागणी वीर सावरकर कॉलनीतील महिलांनी केली.

पावसात वीर सावरकर व कॉलनीची फार दुर्दशा होते . . रस्ता चिखलाने भरलेला असतो . या रस्त्यावरून सायकलही घेऊन जाता येत नाही, अशी परिस्थिती आहे. बेळगावला स्मार्टसिटीचा किताब मिळाला आहे. पण स्मार्टसिटीमध्ये आमच्या कॉलनीची दुर्दशा बघा. येथील लहान मुले व महिलांना, जवळच्या वृद्धाश्रमातील सदस्यांनाही चालता येत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ही समस्या तातडीने सोडवावी, अशी मागणी वीर सावरकर कॉलनीतील रहिवासी प्रभाकर गुंजी यांनी केली.

याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या वेळी वीर सावरकर कॉलनीतील रहिवाशांचा सहभाग होता.

Tags: