Kagawad

उगार खुर्द येथे उभारण्यात येणाऱ्या श्रीकृष्ण मूर्तीचे भव्य स्वागत

Share

कागवाड तालुक्यातील उगार खुर्द येथे भव्य श्री कृष्ण मंदिराची उभारणी करण्यात आली असून या मंदिरात प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणाऱ्या श्री कृष्ण मूर्तीचे भव्य स्वागत करण्यात आले.

एका मुस्लिम युवकाकडून गेल्या ३० वर्षांपासून सुरु असलेल्या अविरत सेवेतून, तसेच भाविकांनी देणगीदाखल दिलेल्या १.२५ कोटी रुपयांच्या निधीतून भव्य श्री कृष्ण मंदिराची उभारणी होत असून या मंदिरात श्रीकृष्णाची मूर्ती प्राणप्रतिष्ठापना आणि कळसारोहण कार्यक्रम आयोजिण्यात आला आहे. बुधवारी सायंकाळी शेकडो भाविकांच्या उपस्थितीत श्रीकृष्ण मूर्तीचा भव्य स्वागत सोहळा मिरवणुकीच्या माध्यमातून पार पडला.

हिंदू-मुस्लिम बंधुभावाचे प्रतीक दर्शवत उगार खुर्द येथील बापूसाहेब शौकतली तासेवाले या मुस्लिम समाजातील संगीतकाराने गेल्या ३० वर्षांपासून श्रीकृष्णाच्या सेवेत स्वतःला झोकून दिले आहे. त्यांच्या या कार्यातून या भागात हिंदू – मुस्लिम बंधुभाव जोपासला जात आहे. उगार येथे आकर्षक पद्धतीने बांधण्यात आलेल्या श्री कृष्ण मंदिरात बुधवार दि. २१ ते २७ ऑगस्ट पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि. २२ ऑगस्ट रोजी होम, शुक्रवार दि. २३ रोजी कळसारोहण, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा, सोमवार डॉ. २६ रोजी ज्ञानेश्वरी पारायण, आणि मंगळवार दि. २७ रोजी गोपाळकाला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती बापूसाहेब तासेवाले यांनी दिली आहे.

या कार्यक्रमास हुक्केरी गुरूशांतेश्वर हिरेमठाचे चंद्रशेखर शिवाचार्य स्वामी, विजयपूर ज्ञानयोगाश्रमचे अध्यक्ष बसवलिंग स्वामी, परमानंद वाडी येथील ब्रम्हानंद मठाचे डॉ. अभिनव ब्रम्हानंद महास्वामी, शिरगुर आश्रमाचे सद्गुरू अभिनव कलमेश्वर महाराज आणि महाराष्टातील प.पु. गुंडीबुवा महाराजांची उपस्थिती लाभणार आहे.

यासंदर्भात श्रीकृष्ण मंदिराचे भाविक आणि कमिटी सदस्य जयगौडा पाटील बोलताना म्हणाले, बापूसाहेब तासेवाले हे मुस्लिम समाजातील जरी असले तरी ते भगवान श्रीकृष्णाचे खरे भक्त आहेत. या मंदिराच्या उभारणीसाठी त्यांनी सुमारे 1.25 कोटी रुपयांची देणगी जमा केली असून या निधीतून भव्य मंदिर बांधण्यात आले आहे. या मंदिरात श्री कृष्ण मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

या मंदिरासाठी विशेष सेवा दिलेल्या रायबाग तालुक्यातील हालशिरगुर येथील श्रीकृष्ण भक्त सदाशिव दळवाई दाम्पत्याला पूजेचा मान देण्यात आला असून या कार्यक्रमासाठी राजेश जोशी यांचे पौरोहित्य लाभणार आहे. तसेच जयगौडा पाटील, अशोक शेट्टी, संदीप जाधव, रमेश हिंगोले, रावसाहेब पाटील, विठ्ठल वाघे, प्रमोद तापाडिया, महावीर करजगी, सुरेश मेट्टूरी, वीरभद्र कटगेरी, महादेव कटगेरी आदी उपस्थित राहणार आहेत.

Tags: