भाजपने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर निशाणा साधला आहे. कोणत्याही कारणास्तव मुख्यमंत्री बदलणार नाहीत, 100 टक्के सिद्धरामय्याच मुख्यमंत्री राहतील अशी परखड प्रतिक्रिया बेळगाव जिल्हा पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केली आहे.
आज प्रसार माध्यमांशी बोलताना मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले की, सिद्धरामय्या यांचे सरकार अस्थिर करण्याच्या उद्देशाने भाजपने रणनीती आखली आहे. मात्र अखेर 100 टक्के सिद्धरामय्याच मुख्यमंत्री राहतील. भाजपने सरकार अस्थिर केल्याची अनेक उदाहरणे आहेत. मुख्यमंत्र्यांवर आरोप केले आहेत याप्रकरणी तपास सुरू आहे. मात्र अद्याप कोणतेही आरोप सिद्ध झालेले नाहीत. मुख्यमंत्री बदलण्याचा प्रश्नच येत नाही, अशीही प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्र्यांबाबत राज्यपालांनी घेतलेल्या निर्णयाबाबत आम्ही कायदेशीर आणि राजकीय लढा देऊ. हायकमांड देखील आमच्यासोबत असेल अशी ग्वाही हायकमांडने दिली आहे. कर्नाटक किंवा अन्य कोणत्याही राज्यात काँग्रेसचे मुख्यमंत्री बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केली.


Recent Comments