Kagawad

कागवाड : पाण्यात बुडणारा तरुण सुदैवाने बचावला

Share

सोमवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे उगार येथील एक तरुण दुचाकीसह नाल्यात वाहून गेला, मात्र सुदैवाने झडाच्या फांद्यांच्या आधारामुळे तो बचावला आहे.

उगार, मंगसुळी, फरीदाखानवाडी परिसरात सोमवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे लोकुर परिसरातून वाहणारा चारकमान नाला तुडुंब भरून वाहत असल्याने या पाण्यातून एक तरुण वाहून गेला मात्र सुदैवाने तो बचावला आहे.

वीरेश महादेव नाईक असे या तरुणाचे नाव असून सुदैवानेच त्याचा जीव बचावला आहे.
घडलेल्या प्रकाराबाबत विरेश महादेव नाईक या तरुणाने माहिती दिली. वाल्मिकी शहरातील या भागातून दुचाकी घेऊन रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना दुचाकीसह सुमारे 500 मीटर पर्यंत आपण वाहत गेलो.. शेवटी गावातील झाडाझुडपांना पकडून आपला जीव वाचवून आपण सुखरूपपणे बाहेर पडलो. या समस्येकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष घालून समस्या सोडवावी अशी मागणी या तरुणाने केली.

या घटनेची माहिती देताना, विरेशचे वडील महादेव नाईक म्हणाले, काल रक्षाबंधन सणानिमित्त शाळांना सुट्टी होती. या मार्गाने विरेश दररोज शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जात असतो. मुले सोबत असती तर मोठा अनर्थ घडू शकला असता, मुसळधार पाऊस पडल्याने अचानक नाला भरल्याने हा प्रकार घडल्याचे ते म्हणाले.

वाल्मिकी नगरमध्ये सुमारे 80 टक्के वाल्मिकी समाजाची कुटुंबे राहतात. येथील रस्त्याच्या समस्येची बाब लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. मात्र, याकडे लक्ष दिले गेले नाही. हा भाग उगार नगरपालिका प्रभाग क्र. १८ मध्ये येत असून, पालिका अधिकारी वाल्मिकी यांनी सोसायटीसाठी सुमारे ७० लाखांचा निधी मंजूर केला आहे. याठिकाणी वीज व्यवस्थेसाठी अनुदानाची तरतूद करण्यात आली असून वाल्मिकी सोसायटीच्या अनुदानाचा गैरवापर केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. आमदार राजू कागे, जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी याप्रकरणी कटाक्षाने लक्ष पुरवावे अशी मागणीही महादेव नाईक यांनी केली.

उगार नगरपालिकेचे मुख्याधिकारी एम. आर. नदाफ यांची भेट घेऊन स्थानिकांनी सदर समस्यां सोडविण्याबाबत निवेदन दिले.यावेळी राखीव अनुदानासंदर्भात माहिती घेऊन रस्त्याची होणारी गैरसोय दूर करू, असे आश्वासन त्यांनी दिले.

राज्यात वाल्मिकी समाजाच्या अनुदानाचा गैरवापर होत असल्याची चर्चा होती, आता त्याच समाजाच्या अनुदानाचा पालिकेत गैरवापर होत आहे असा आरोपही होत आहे. राजू महादेव नाईक, शंकरा इराप्पा नाईक, राजू राजमाने, आप्पासाहेब गिडगोळ, वर्धमान देवमोरे, विनोद देवमोरे, प्रशांत मेसुतगे, विश्वनाथ देसाई आणि इतर अनेक शेतकऱ्यांनी उगार नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदन सादर केले.

Tags: