Kagawad

कोलकाता घटनेचा कागवाडमध्ये डॉक्टरांकडून निषेध

Share

वैद्यकीय विद्यार्थिनीवरील बलात्कार व निर्घृण हत्येचा निषेध करत आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी उगार मेडिकल असोसिएशन, आयुष्य फेडरेशन , इंडियन डेंटल असोसिएशन, कागवाड यांच्या वतीने शहरातील शेडबाळ रोडपासून राणी चन्नमा सर्कल पर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला.

चन्नम्मा सर्कल मध्ये मानवी साखळी तयार करून , या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला .
यावेळी शेडबाळचे ज्येष्ठ डॉक्टर डॉ. अशोक पाटील म्हणाले की, पश्चिम बंगाल राज्यातील वैद्यकीय विद्यार्थिनीवर झालेला बलात्कार आणि हत्या ही नागरी समाजाला काळिमा फासणारी घटना आहे, सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी या कृत्याचा नि:पक्षपातीपणे निषेध करून गुन्हेगारांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी.

डॉ.अमुल सरडे म्हणाले की, कागवाड तालुक्यातील वैद्यकीय संघटनेच्या शंभरहून अधिक डॉक्टरांनी सकाळपासून दवाखाने बंद ठेवून आंदोलन केले असून वैद्यकीय विद्यार्थिनीच्या हत्येला जबाबदार असलेल्या गुन्हेगारांना फाशी देण्यासाठी आमचा लढा सुरूच राहणार असल्याचा इशारा दिला.

निषेध रॅलीमध्ये डॉ.आवरडे, डॉ.देशपांडे, डॉ.बरमुडे , डॉ.अशोक पाटील, डॉ.जोग, डॉ.आनंद मुतालिक , डॉ.साबदे या ज्येष्ठ डॉक्टरांनी तसेच तरुण डॉक्टरांनी हात उंचावून निषेध केला. .

आंदोलकांनी तहसीलदारांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन दिले, निवेदन स्वीकारून तहसीलदार राजेश बुर्ली यांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पंतप्रधान यांच्या कार्यालयात पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी डॉ. मोहन कटगेरी, डॉ.महाधवल बोमाज, डॉ.विनायक पोतदार , डॉ.सचिन निक्कम, डॉ.गिरीश हिरेमठ, डॉ. नांदणी , डॉ.शहा, डॉ.महावीर पाटील, डॉ.विनोद मुडलगी,
डॉ. पुष्पलता सुन्नदकल यांच्यासह अनेक डॉक्टर या आंदोलनात सहभागी झाले होते.

Tags: