राज्यसभा सदस्य सुधामूर्ती यांचा ऐतिहासिक विजयपूर जिल्ह्याशी अतूट संबंध आहे. विजयपूरमध्ये बालपण गेलेल्या सुधामूर्ती यांचे येथे नातेवाईक आहेत. ऐतिहासिक विजयपुर जिल्ह्याची नोडल जिल्हा म्हणून त्यांची निवड करण्यात आली असून त्यांच्या या निवडीनंतर विजयपूरवासियांनी आनंद व्यक्त केला आहे.
नोडल जिल्हा जाहीर झाल्यानंतर पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना राज्यसभा सदस्य सुधामूर्ती म्हणाल्या की, विजयपूर जिल्ह्यातील जमखंडी तालुक्यातील सावलगी येथे सुमारे 600 वर्षांपासून आपल्या अनेक पूर्वजांनी वास्तव्य केले आहे. त्यामुळे विजयपूर जिल्ह्याशी त्यांचे भावनिक नाते असून विजयपूर जिल्ह्यावर विशेष प्रेम आहे. राज्यसभेचे सदस्य म्हणून देशातील कोणताही जिल्हा नोडल जिल्हा म्हणून निवडला जाऊ शकतो. आपण कर्नाटकातील असल्याने विजयपूर जिल्हा नोडल जिल्हा म्हणून निवडला गेला याचा अभिमान असल्याचे त्या म्हणाल्या.
आजही अनेक पर्यटक दिल्ली, मुंबई आणि इतर भागातून विजयपुर येथे येतात. त्यामुळे पर्यटन क्षेत्राला बळकटी देण्यासाठी अधिकाऱ्यांशी आपण चर्चा करून या भागातील पर्यटन स्थळांच्या विकासाला प्राधान्य देणार असल्याचे सुधामूर्ति यांनी सांगितले. कायकल्प पुरस्कार मिळालेल्या विजयपूर जिल्हा रुग्णालयात धर्मशाळा स्थापन करण्याची गरज आहे. याबाबत जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे. सिंदगी, बसवनबागेवाडी आणि तालिकोटी येथे सुसज्ज ग्रंथालये स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विजयपूर जिल्ह्यातील लोक कुशल आहेत. येथे व्यायामशाळेची गरज आहे. त्यामुळे या भागासाठी अशा अनेक योजना आखल्या आहेत. आगामी काळात प्राधान्यक्रमानुसार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. कुमटगीच्या उन्हाळी वाड्याच्या विकासासाठी दोन कोटी रुपयांचे अनुदान देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सुधामूर्ती यांच्या कार्याबद्दल जिल्ह्यातील जनतेने कृतज्ञता व्यक्त केली आहे. आपले बालपण विजयपूरमध्ये व्यतीत केलेल्या आणि विजयपूर जिल्ह्यासाठी योगदान देण्यासाठी पुढाकार घेतलेल्या सुधामूर्ति यांचे कौतुक होत आहेच मात्र दुसरीकडे आपल्या विजयपूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी आजवर अशा कोणत्याही योजना समोर आणल्या नाहीत याबाबत खंत व्यक्त केली जात आहे.
विजयकुमार सारवाड,
इन न्यूज मराठी, विजयपूर


Recent Comments