बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील चचडी येथे दूषित पाणी प्यायल्याने ४१ हून अधिक जणांची प्रकृती बिघडली असून एका महिलेला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. या घटनेने खडबडून जागे झालेल्या तालुका प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत.
सौंदत्ती तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून दूषित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, उलट्यांचा त्रास सुरू झाल्याने सुमारे 41 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एक महिला अतिदक्षता विभागात असून तिला पुढील उपचारासाठी बेळगावमधील बिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तालुका पंचायत ईओ यशवंत कुमार यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना सांगितले की, या समस्येवर आधीच खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात असून गावकऱ्यांना नळाऐवजी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच गावात स्वच्छतेचे काम हाती घेण्यात येत असून नाल्यांची स्वच्छता करण्यात येत आहे. युद्धपातळीवर स्वच्छतेचे कामकाज सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
तालुका आरोग्य अधिकारी श्रीपाद सबन्नी यांनी सांगितले की, आजारी नागरिकांवर उपचार सुरू आहेत. आमदार महांतेश कौजलगी यांनीही भेट देऊन पाहणी करून उपचारासाठी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले असून ग्रामस्थांच्या तब्येतीत बदल झाल्यास त्यांनी तातडीने स्थानिक आरोग्य केंद्रात उपचार घ्यावेत. त्यांना पुढील उपचारासाठी घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका यंत्रणाही तयार करण्यात आली आहे. प्रत्येक घरोघरी जाऊन तपासणी करण्यासाठी आरोग्य विभागाने विशेष पथके तयार केली आहेत. लोकांना पाणी उकळून पिण्याचा सल्ला दिला जात असल्याचे ते म्हणाले.
पिण्यताच्या पाण्यामुळे उद्भवलेल्या या समस्येच्या पार्श्वभूमीवर तालुका प्रशासनासहित ग्रामस्थांनीही काळजी घेणे गरजेचे आहे.
दूषित पाणी पिऊन गंभीर आजारी पडलेल्या चचडीतील महिलेवर बेळगाव जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी महेश कोणी यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच चचडीत आरोग्य विभागाकडून खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पुरवठा केलेल्या पाण्याची चाचणी घेण्यात येत आहे. आजारी महिलेवर पुरेसे उपचार केले जात आहेत. चचडी आरोग्य केंद्रातही पुरेशी औषधे उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
Recent Comments