बेळगावचा विकास स्मार्ट सिटी अंतर्गत करण्याचा बोलबाला गेल्या काही वर्षांपासून सतत ऐकिवात येत आहे. परंतु प्रत्यक्षात स्मार्ट सिटीच्या कामांचा दर्जा कितपत राखला गेलाय हे बेळगावमध्ये राबविण्यात आलेल्या प्रत्येक विकासकामांवरून दिसून येत असून याचाच प्रत्यय सध्या ओल्ड पी बी रोडवर दिसून येत आहे.
शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी, वाढलेली वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी शहरात अनेक ठिकाणी उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात आली. यापैकीच एक असणारा जुन्या पी बी रोड लगत असलेला उड्डाणपूल! या उड्डाणपुलाच्या निर्मितीपासूनच सर्व्हिस रोडवर पाणी साचत असून याचा फटका येथील रहिवाशांना आणि प्रामुख्याने व्यावसायिकांना बसत आहे. पावसाळ्यात तर हि समस्या डोकेदुखी ठरत असून पुलाच्या अशास्त्रीय बांधकामामुळे सर्व्हिस रोडलगतच्या दुकानांमध्ये पाणी तुंबून लाखोंचे नुकसान होण्याचे प्रकार वाढले आहेत.
ज्यावेळी उड्डाणपुलाची निर्मिती झाली त्यावेळेपासूनच याठिकाणी हि समस्या निर्माण झाली असून गटारी स्वच्छ न केल्याने सातत्याने या समस्येला तोंड द्यावे लागते. नागरिक घरातील कचरा देखील गटारीत टाकल्याने गटारी तुंबतात. यामुळे पाऊस झाला कि रस्त्यावरून, गटारीतून वाहून आलेले पाणी थेट दुकानात शिरते.
योग्य वेळी हि समस्या लक्षात घेऊन सोडविण्याचे प्रयत्न केले असते तर हि परिस्थितीच उद्भवली नसती. दुर्गंधीचा सामना तर करावाच लागतो परंतु दुकानातील साहित्याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होते. पाणी तुंबल्याने ग्राहक खरेदीसाठी येत नाहीत. यामुळे जवळपास १० ते १५ लाखांचे नुकसान आपल्याला झाले असून या भागाला कुणी वाली आहे का? असा प्रश्न येथील काचेचे व्यावसायिक अशोक बिर्जे यांनी उपस्थित केला आहे.
उड्डाणपुलाच्या शेजारी दुचाकी, चारचाकी वाहनांच्या दुरुस्तीची अनेक आस्थापने आहेत. याचबरोबर ऑटोमोबाईल क्षेत्राशी निगडित असंख्य दुकाने आहेत. ज्या ज्या वेळी पाऊस वाढतो त्या त्या वेळी पावसाच्या, गटारीच्या पाण्याचा निचरा न झाल्याने पाणी रस्त्यावरून वाहू लागते. परिणामी येथील सर्व्हिस रोड लगतच्या दुकानांमधून मोठ्या प्रमाणात पाणी तुंबते. ३ ते ४ दिवस या ठिकाणी पाणी तुंबल्याने दुर्गंधी येते. हि बाब लक्षात घेऊन गटारीचे कामकाज योग्यपद्धतीने कावे, तसेच गटारी स्वच्छ करून चेम्बर बांधण्यात यावे, गाळ काढण्यात यावा, अशी ,मागणी इराप्पा मदनबावी यांनी केली.

या भागातील आणखीन एका व्यावसायिकाने इन न्यूज ला माहिती देताना सांगितले कि, गटारी स्वच्छ न केल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा न होता पाणी थेट रस्त्यावरून वाहून दुकानात शिरले. १५ ते २० दिवस दुकाने बंद करून बसण्याची वेळ आली. गटारी तुंबल्याने हि समस्यां निर्माण झाली. यादरम्यान प्रशासनाने गटारी फोडून पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्ग मोकळा करून दिला परंतु दरवर्षी गटारी स्वच्छ न केल्याने हि समस्या उद्भवते. यामुळे डासांचाही प्रादुर्भाव वाढला असून उदरनिर्वाहासाठी नाईलाजास्तव याच परिस्थितीत काम करावे लागत आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
स्मार्ट सिटीच्या नावाखाली झालेल्या निकृष्ट दर्जाच्या कामकाजामुळे नागरिकांना याचा फटका बसत असून स्मार्ट सिटी अधिकारी, पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या विरोधात जनता आता संताप व्यक्त करत आहे. ओल्ड पी बी रोड वरील हि समस्या गेल्या अनेक वर्षांपासून अशाच परिस्थितीत असून या समस्येकडे गांभीर्याने लक्ष पुरवून सोडविण्यासाठी पुढाकार घयावा, अशी मागणी होत आहे.


Recent Comments