Belagavi

संतीबस्तवाड प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची इमारत मोडकळीस

Share

संतीबस्तवाड गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीची दुरवस्था झाली असून, मूलभूत सुविधांपासून हे केंद्र वंचित आहे.

बेळगाव तालुक्यातील संतीबस्तवाड गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची इमारत जीर्ण अवस्थेत उभी असून या इमारतीच्या खिडक्या आणि दरवाजे अक्षरशः मोडकळीस आले आहेत. तुटलेल्या अवस्थेतील शौचालय आणि एकंदर इमारतीची परिस्थिती पाहता कोणत्याही क्षणी इमारत कोसळेल या भीतीने ही इमारत रिकामी करून गावाबाहेर भाड्याच्या घरात प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे कार्यालय सुरू केले आहे. आरोग्य कर्मचारी सकाळी येतात आणि संध्याकाळी निघून जातात. मात्र या केंद्रात उपचाराची देखील वानवा झाली असून ग्रामस्थांचे आरोग्य सेवे अभावी हाल होत आहेत.

गावात मोठ्या प्रमाणात डेंग्यूचे रुग्ण आढळून येत असून त्यांच्यावरील उपचारासाठी येथे कोणतीच व्यवस्था नाही. आशा वर्कर्सना सभा घेण्यासाठी जागा नाही, गर्भवती स्त्रियांना, वृद्ध आजारी व्यक्तींच्या उपचाराची सोय नाही, कि पोषण अभियानाचा कार्यक्रम करणे शक्य नाही. गेल्या वर्षभरापासून या केंद्रात प्रसूती करण्यात आली नाही. कारण तशी कोणतीही व्यवस्था याठिकाणी नाही. रात्रीच्या वेळी आरोग्य कर्मचारी येथे उपलब्ध नसतात. बालकांची लसीकरण व तपासणी होत नाही. लोकांना योग्य आरोग्य सेवा मिळत नाही.

संतीबस्तवडा गाव दत्तक घेतलेल्या विश्वेश्वरय्या टेक्निकल युनिव्हर्सिटीने या इमारतीची दुरुस्ती करणार असल्याचे सांगितले. त्याचा अंदाज घेतला होता. मात्र वर्षभरानंतरही त्यांनी दुरुस्ती केलेली नाही. या भागातील आमदार व मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर व संबंधित शासकीय विभाग, मंत्री, विधान परिषद सदस्य यांना ग्रामपंचायतीच्या वतीने निवेदन देऊनही अद्याप या इमारतीची दुरुस्ती झालेली नाही. नवीन इमारतीलाही मंजुरी मिळालेली नाही.

महिला व बालकल्याण मंत्र्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या या भागात महिला आणि बालकांचा मृत्यू झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. याठिकाणी योग्य सुविधा असती तर जीव वाचविण्यात यश आले असते. या समस्येकडे महिला व बालकल्याण मंत्री, लोकसभा सदस्य व संबंधित विभागाने नवीन इमारत बांधावी, अशी मागणी येथील ग्रामस्थ करत आहेत.

Tags: