कित्तूरच्या निंगापुर गावातील हुलीकेरे बॅकवॉटरमधून दररोज शालेय विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास सुरु असून अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हि परिस्थिती ओढवल्याचा आरोप करत ग्रामस्थ संताप व्यक्त करत आहेत.
बेळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहत असून कित्तूर तालुक्यातील निंगापुर गावातील विद्यार्थ्यांचा पाण्यातून ट्यूब राफ्ट च्या माध्यमातून बॅकवॉटर मधून पुढे जाण्यासाठी जीवघेणा प्रवास सुरु असल्याचे निदर्शनात आले आहे. गेल्या 20 वर्षांपासून निंगापूर येथील नागरिक याठिकाणी पूल बांधण्यासाठी अधिकाऱ्यांकडे दाद मागत आहेत, पण अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे याठिकाणी पुलाचे काम न झाल्याने मुसळधार पावसामुळे हुलीकेरेचे बॅकवॉटर ओलांडण्यासाठी विद्यार्थ्यांना धडपड करावी लागत आहे.
या भागातील विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी रबर ट्यूबच्या साहाय्याने बॅकवॉटर चा टप्पा पार करत असून एकीकडे मुसळधार पाऊस, तर दुसरीकडे शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांची सर्कस सुरू आहे. हि समस्याच प्रत्येक पावसाळ्यात उद्भवते. लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या निदर्शनास हि बाब आणून देऊनही कोणीही याकडे लक्ष दिले नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली.
या तलावात दररोज पावसाळ्यात 10 विद्यार्थी ट्यूब राफ्टवर बसून जीवघेणा प्रवास करून शाळेत येतात. तसेच नागरिकांचेही यामुळे अनेक हाल होत असून अधिकाऱ्यांनी तातडीने या समस्येकडे लक्ष पुरवून पूल बांधण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
हि समस्या लक्षात येताच बेळगावचे जिल्हाधिकारी मोहमद रोशन यांनी तातडीच्या उपाययोजना आखत उद्यापासून जिल्हा प्रशासनाकडून बोटीची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. यासंदर्भात कित्तूरचे आमदार आणि तहसीलदारांशी चर्चा करण्यात आली असून मुलांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये यासाठी उद्या निंगापूर गावातील हुलीकेरे तलावात बोटीची व्यवस्था करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी निंगापूर गावाला भेट देऊन गावातील तलावाची पाहणी करून निंगापूर गावातील हुलीकेरे तलावाच्या बॅकवॉटरबाबत तहसीलदार व सार्वजनिक बांधकाम विभागाशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या २० वर्षांपासून या भागातील समस्या निवारण्यासाठी सातत्याने मागण्या करण्यात येत होत्या. अखेर या मागण्या मान्य करण्याच्या दृष्टीने उपाययोजना आखण्यात येत असून निंगापूरमधील विद्यार्थ्यांना उद्यापासून बोटीची व्यवस्था तर लवकरच पूल देखील बांधण्यात येणार आहे.
Recent Comments