जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या बेळगाव शाखेच्या वतीने गेल्या तीन वर्षांपासून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असून यावर्षीही १५ ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते ९ या वेळेत, भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे रक्तदान शिबिराचे समन्वयक कुंतीनाथ कलमणी यांनी सांगितले.
बेळगावात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, जितो संस्था गेली तीन वर्षे रक्तदान शिबिराचे आयोजन करत आहे. गतवर्षी एका दिवसात ९३६ युनिट रक्त जमा करून विक्रम प्रस्थापित केला होता, यंदाही नवा विक्रम करण्याच्या दिशेने काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
या रक्तदान शिबिरात केएलई ब्लड बँक, महावीर ब्लड बँक, बीम्स ब्लड बँक, आणि बेळगाव ब्लड बँक देखील सहभागी होणार असून या शिबिरातील रक्तदात्यांना एक वर्षासाठी एक लाख रु. पर्यंतची अपघात विमा पॉलिसी प्रीमियमचा भार जितो उचलणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
या रक्तदान शिबिरासाठी बेळगावातील विविध संस्था, रोटरी संस्था, बीसीसीआय, उद्योग, उपक्रम, शैक्षणिक संस्था यांनीही सहकार्य करण्यासाठी पुढे आले असून एकूणच हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी सहकार्य करत असल्याची माहिती त्यांनी दिली.
या रक्तदान शिबिरात जमा झालेले रक्त सर्व रक्तपेढ्यांमध्ये ठेवण्यात आले आहे. जितो इन्स्टिट्यूटमध्ये कोणालाही रक्ताची गरज भासल्यास त्यांनी जितो संस्थेशी संपर्क साधल्यास त्यांना त्वरित रक्त उपलब्ध करून देण्याची व्यवस्था आहे. जितोच्या उद्यमबाग येथील कार्यालयात संपर्क साधून रक्त मिळू शकते, अशी माहिती त्यांनी दिली.
या प्रसंगी केएलई रक्तपेढीचे समन्वयक डॉ.विरगी म्हणाले की, जितो संस्थेने आयोजित केलेले रक्तदान शिबिर हा अतिशय समयोचित कार्यक्रम आहे, जो आमच्या केएलई रक्तपेढीसाठी खूप फायदेशीर आहे. दररोज ग्रामीण भागातील लोक बेळगावात येतात तेव्हा गरजेच्या वेळी रक्ताची मागणी होते. अशा वेळी गरजूंना रक्तदान करणे सोयीचे व्हावे यासाठी जितो संस्थेने या उपक्रमाचे आयोजन केले आहे. प्रत्येकाने रक्तदान करावे जेणेकरून आरोग्य चांगले राहील, असे सांगून ते म्हणाले, शिबिरात दिलेल्या रक्ताचे नमुने प्रत्येक प्रकारे तपासले जातील व साठवले जातील. गरजूंनी जितो संस्थेशी संपर्क साधावा, असे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत जितोचे अध्यक्ष वीरधवल उपाध्याय, सचिव अशोक कटारिया, रक्तदान शिबिराचे मुख्य समन्वयक हर्षवर्धन इंचल, जितोचे सदस्य अभय हादिमनी आदी उपस्थित होते.


Recent Comments