आम्हाला सत्तेत यायचे आहे म्हणून भ्रष्ट काँग्रेस सरकार उलथून टाकण्यासाठी आम्ही पदयात्रा काढत आहोत अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी व्यक्त केली. म्हैसूर विकास प्राधिकरण (मुडा) जमीन वाटप घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्याची मागणी करत भाजप आणि जेडी(एस) नेत्यांनी संयुक्तपणे म्हैसूर चलो पदयात्रा सुरू केली असून या मंड्या येथे पदयात्रेचा चौथा दिवस पार पडला.

या पदयात्रेत महिला वर्गानेही कलश घेऊन सहभाग घेतला.भाजप प्रदेशाध्यक्ष बी.वाय.विजयेंद्र, मुरुगेश निरानी, बी.सी.पाटील यांच्यासह भाजपचे विविध नेते, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. या पदयात्रेला संबोधित करताना भाजप प्रदेशाध्यक्ष बी.वाय.विजयेंद्र म्हणाले की, आमच्या पदयात्रेचा उद्देश अनुसूचित जाती-जमातींच्या पैशांची लूट करणाऱ्या सरकारचा छडा लावणे, भ्रष्ट मुख्यमंत्र्यांना खाली आणणे आणि शोषित समाजाला न्याय मिळवून देणे हा आहे.

वाल्मिकी विकास महामंडळाच्या पैशांच्या गैरव्यवहारप्रकरणी एसआयटीने दाखल केलेल्या आरोपपत्रात बळ्ळारीचे आमदार बी. नागेंद्र आणि महामंडळाचे अध्यक्ष बसनगौडा दड्डल यांना वगळण्यात आले असून एसआयटी हि आपलीच संस्था असल्याचे काँग्रेस नेत्यांना वाटत आहे. कर्नाटकात पोलिसांचा एवढा वापर झाल्याचे आजवर दिसून आले नसल्याचे ते म्हणाले.

यादगिरी येथील पीएसआय परशुराम यांच्या आत्महत्येला काँग्रेस आमदार चन्नरेड्डी पाटील आणि त्यांचा मुलगा पम्पनगौडा जबाबदार असल्याची तक्रार मृताच्या पत्नीने केली असून याप्रकरणी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना संविधानाबद्दल आदर असेल तर त्यांनी आमदारांना तातडीने अटक करावी, अशी मागणीही त्यांनी केली.


Recent Comments