म्हैसूर नागरी विकास प्राधिकरणाने (मुडा) बेकायदेशीर जमीन वाटप केल्याप्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजप-जेडीएसने संयुक्तपणे आयोजित केलेल्या म्हैसूर चलो पदयात्रेचा आज तिसरा दिवस असून केंगळमधून पदयात्रेला सुरुवात करण्यात आली.

केंगळ येथील श्री हनुमंत स्वामींच्या आशीर्वादाने म्हैसूर चलो पदयात्रेच्या तिसऱ्या दिवसाच्या पदयात्रेला सुरुवात झाली. भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार बी.वाय. विजयेंद्र आणि जेडीएस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, केंद्रीय मंत्री एच.डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखाली भाजप-जेडीएसने संयुक्तपणे या पदयात्रेचे आयोजन केले होते. वाल्मिकी विकास महामंडळातील 187 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी, म्हैसूर मुडामधील 5 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करत हजारो लोक या पदयात्रेत सहभागी होत आहेत.
राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर. अशोक, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते चलवादी नारायणस्वामी, माजी उपमुख्यमंत्री डॉ. सी.एन. अश्वत्थनारायण, प्रदेश सरचिटणीस सुनीलकुमार, आमदार अरविंद बेल्लद, चन्नबसप्पा, सी.के. राममूर्ती, रविसुब्रह्मण्य, बसवराज मत्तीमोड, एस. के. सुरेश, डॉ.शैलेंद्र बेलदाळे, माजी मंत्री भैरती बसवराज, प्रभू चौहान, खासदार रेणुकाचार्य यांनी पदयात्रेत सहभाग घेतला.
यावेळी मुख्यमंत्री सिध्दरामयांच्या राजीनाम्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. काँग्रेस सरकारविरोधी घोषणा देत घोटाळ्याचे पैसे परत देण्यात यावेत, आणि मागण्या पूर्ण करण्यात याव्यात यासाठी घोषणाबाजी करण्यात आली.
या पदयात्रेत दोन्ही पक्षांचे नेते, पदाधिकारी, खासदार, माजी खासदार, आमदार, माजी आमदार आणि भाजप- जेडीएस पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Recent Comments