Belagavi

ग्रामदेवता मंगाई देवी यात्रा अपूर्व उत्साहात

Share

शहरातील वडगाव येथील ग्रामदेवता श्री मंगाई देवीची यात्रा आज भक्तिपूर्ण वातावरणात पार पडली. विशेष म्हणजे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या पशुबळीवर यंदा बंदी घालण्यात आल्याने यात्रेच्या इतिहासात प्रथमच हि यात्रा पशुबळी न देता अत्यंत उत्साहात पार पडली.

सालाबादप्रमाणे यंदाही वडगावची ग्रामदेवता श्री मंगाईदेवीची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. पारंपरिक पद्धतीने चव्हाण-पाटील घराण्याच्या नेतृत्वाखाली मंगाई देवीची यात्रा आयोजिण्यात आली होती. यात्रेच्या पार्श्वभूमीवर देवस्थान आकर्षक पद्धतीने सजविण्यात आले होते. तसेच यात्रा परिसरात हार, फुले, खेळणी, गृहोपयोगी साहित्य, अम्युजमेंट पार्क, खाद्यपदार्थांचे स्टॉलदेखील उभारण्यात आले होते.

यावेळी इन न्यूजशी बोलताना विनायक चव्हाण पाटील यांना यात्रेचे स्वरूप सांगितले. वडगाव येथील श्री मंगाई देवी यात्रा हि शहरातील सर्वात मोठी यात्रा म्हणून प्रसिद्ध असून यात्रेच्या आधी १ महिना वार पाळले जातात. यात्रेच्या मुख्य दिवशी गाऱ्हाणे घातल्यानंतर मुख्य यात्रेला सुरुवात होते. १८१० सालापासून कुरुंदवाड सरकारच्या काळापासून हि यात्रा सुरु असून यात्रेसाठी बेळगावसह कर्नाटकातील विविध भागातील तसेच महाराष्ट्र आणि गोव्यातील भाविकही दाखल होतात, असे ते म्हणाले.

यावेळी नगरसेविका रेश्मा कामकर आणि दीपाली संतोषकर यांनीही इन न्यूजला प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना त्यांनी या यात्रेचे महत्व सांगितले. महानगरपालिकेच्या वतीने यात्रेसाठी लागणाऱ्या सर्व सुविधा पुरविण्यात आल्या असून दरवर्षीप्रमाणेच यंदाही मोठ्या उत्साहात हि यात्रा पार पडत असल्याचे त्या म्हणाल्या.

या यात्रेच्या पार्श्वभूमीवर पशुबळी देण्याची प्रथा आजवर चालत आली असून यंदा उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पशुबळीवर बंदी घालण्यात आली होती. यासंदर्भात बोलताना विश्व प्राणी कल्याण मंडळ, बसवधर्म ज्ञानपीठ, पशुप्राणीबळी निर्मूलन जागृती संघाचे दयानंद स्वामीजी बोलताना म्हणाले, देवाची आराधना भक्तिपूर्ण पद्धतीने होणे गरजेचे आहे. पशु-प्राणी बळी देऊन अहिंसेने देवाची भक्ती होऊ शकत नाही. यात्राकाळात पशुबंदीचा आदेश पाळण्यासाठी जिल्हा प्रशासनासह पोलीस प्रशासन, देवस्थान कमिटी आणि नागरिकांनीही उत्तम सहकार्य देऊन यात्रा भक्तिपूर्ण वातावरणात पार पाडली याचे कौतुक आहे, असे ते म्हणाले.

भर पावसातही यात्रा परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला असून यात्रा काळात होणारी गर्दी आटोक्यात आणण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त आणि सीसीटीव्ही ची सोय देखील करण्यात आली आहे.

Tags: