विजयपूरचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांच्यानंतर आता आमदार आणि माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनीदेखील भाजपमधील नेत्यांवर परखडपणे मत व्यक्त करण्यास सुरुवात केली असून त्यांनी बी. एस. येडियुरप्पा आणि बी. वाय. विजयेंद्र यांच्यावर अप्रत्यक्षरीत्या निशाणा साधत भाजपमधील अंतर्गत मतभेदाला दुजोरा दिला आहे.
अथणी तालुक्यातील हल्याळ गावात प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी मंत्री रमेश जारकीहोळी म्हणाले की, पिता-पुत्र अनेक दिवसांपासून पक्षाला ब्लॅकमेल करत आहेत. भाजप पक्ष वाचवण्यासाठी हायकमांडने ऐतिहासिक निर्णय घ्यावा, अशी आमची विनंती आहे, असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी विरोधकांवरही टीका करत, राज्य सरकारला नैतिकता नाही, राज्य सरकार दिवाळखोर आहे. या सरकारकडे पैसा नाही. सर्वजण भ्रष्टाचारात गुंतलेले आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा हा पहिलाच घोटाळा नसून त्यांनी आता राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे, असे सांगितले. सरकारचे नियंत्रण सुटले असून राज्यातील सरकारला योग्य मार्गावर आणले जाणार नाही. ‘सीडी शिवू’ प्रकरणानंतर सरकारचे पूर्ण नियंत्रण सुटल्याचे सांगत त्यांनी उपमुख्यमंत्री डीकेशींवर देखील निशाणा साधला.
राज्यात वाल्मिकी महामंडळाचा भ्रष्टाचार अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. याविरोधात आम्ही बेळ्ळारी येथे सामूहिक नेतृत्वाखाली पदयात्रा काढणार आहोत. मुडा घोटाळा हा वैयक्तिक आहे. पण, वाल्मिकी महामंडळाचा पैसा हा समाजाचा पैसा असून यामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आम. रमेश जारकीहोळी यांनी केला. वाल्मिकी घोटाळा हा मुडा घोटाळ्यापेक्षा मोठा आहे. हायकमांडने परवानगी दिल्यास पदयात्रेला जाऊ, असे रमेश जारकीहोळी यांनी सांगितले.


Recent Comments