DEATH

अखेरच्या प्रवासातही सोसावे लागले हाल! खानापूरमधील नागरिकांच्या समस्यांचा तिढा सुटता सुटेना!

Share

मूलभूत सुविधांअभावी फरफटत असलेल्या खानापूरमधील विविध भागातील जनतेच्या मागचे ग्रहण सुटता सुटेनासे झाले असून तब्बल ६ किलोमीटर नदी पार करून मृतदेहाला उचलून नेत कृष्णापूर नगर येथील जनतेला मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे.

वनविभागाने व्यापलेल्या खानापूर तालुक्यातील जनता मूलभूत सुविधांअभावी फरफटली जात आहे. या भागातील कृष्णापूर या गावातील व्यक्तीच्या मृत्यूनंतर मृतदेहासहित चक्क ६ किलोमीटर अंतर पार करून ग्रामस्थांना अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. या भागात रस्ते जोडणी नसल्याने पावसाळ्यात ग्रामस्थांचे हाल होतात. या गावात राहणाऱ्या सदानंद नायक नामक व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्त्यू झाला. कृष्णापूर गावाच्या शेजारी असणाऱ्या वाळपई गावात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी मात्र नागरिकांची फरफट झाली. एकीकडॆ मुसळधार पाऊस आणि दुसरीकडे याच पावसातून मार्ग काढत, मृतदेहाला उचलून साकव पार करताना नागरिकांची तारांबळ उडाली.

एकीकडे कुटुंबियांचे दुःख आणि दुसरीकडे अखेरची यात्रा देखील अशाच परिस्थितीत निघावी याहून मोठे दुर्दैव ते काय? विकासाच्या दिशेने झेपावणाऱ्या भारतात आजही असे अनेक दुर्गम भाग आहेत जेथे मूलभूत सुविधा स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानंतर देखील पोहोचविण्यात सरकार अपयशी ठरले आहे. जगज्जेता बनण्याची स्वप्ने पाहणाऱ्या भारतातील अशा भागातील लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी भारताला आणखी किती वर्षे लागणार? असा अगतिक प्रश्न सध्या प्रत्येक सुजाण नागरिकाच्या मनात डोकावत आहे………!

Tags: