हुक्केरी शहरातील संत निरंकारी सत्संग मंडळातर्फे जनतेसाठी मोफत आरोग्य तपासणी तसेच पूरग्रस्तांना विशेष तपासणी व औषध वाटप करण्यात आले.

शहरातील बायपास रोड येथे संत निरंकारी सत्संग मंडळाच्या वतीने आयोजित आरोग्य शिबिराचे आयोजन हुबळी येथील प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉ. पुरुषोत्तम आणि बेळगावच्या संत निरंकारी मंडळाच्या समन्वयक शशी यांनी केले.
प्रसारमाध्यमांशी बोलताना डॉ. पुरुषोत्तम म्हणाले कि, दिल्लीचे सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संत निरंकारी सत्संग मंडळ देशाच्या विविध भागात अनेक सामाजिक कार्य करत आहे.
यावर्षी प्रथमच हुक्केरी शहरात आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यानंतर सुमारे 400 लोकांना विविध आजारांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करून मोफत औषध देण्यात आले, तसेच यावेळी डेंग्यू तापावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्रत्येकाला डेंग्यूची लस देण्यात आली .

हुक्केरीचे समन्वयक व ज्ञान संवर्धक मारुती मोरे म्हणाले की, माताजीच्या वचनाप्रमाणे प्रत्येकाला जात-पात, पंथ न ठेवता निरोगी जीवन जगता यावे, यासाठी राज्याच्या विविध भागात आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येत असून गरजूना मोफत औषधे दिली जात आहेत.
यावेळी हुक्केरी संत निरंकारी मंडळाचे सदस्य भरमण्णा जाधव, बी.जी.दोडमणी, सिद्धेश बेन्नाडीकर, केम्पण्णा अंबाळे, अशोक कलाज , सेवादल संयोजक रमेश भोवी, राजू कोस्ती, सुनीता मोरे, लक्ष्मी जाधव, लावण्य जाधव, चंदू गंगण्णावर, समन्वयक ज्ञान प्रचारक, संदीप सूर्यवंशी, सपना बेनाडीकर व कोल्हापूर, बेळगाव, धारवाड, विजयपूर जिल्ह्यातील सेवादल सेवकांनी शिबीर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.


Recent Comments