Belagavi

बेळगाव जिल्ह्याला अतिवृष्टीचा अलर्ट! परिस्थिती नियंत्रणासाठी जिल्हाप्रशासन सज्ज!

Share

महाराष्ट्रातून लाखो क्युसेकने वाहून येणाऱ्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन करून पूरपरिस्थिती आणखी बिघडू नये म्हणून बेळगाव जिल्हा प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना केल्या असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले.

बेळगावमध्ये बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हि माहिती दिली. मुख्यमंत्री कार्यालय, केबीजेएनएलचे एमडी व जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव तसेच कोल्हापूरचे जिल्हाधिकारी, बेळगाव जिल्हा पालक मंत्री यांच्याशी झालेल्या बैठकीत आपत्ती निवारणासंदर्भात चर्चा करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील कोयना जलाशयातून पाणी सोडण्याबाबतची माहिती दर अर्ध्या तासाला कर्नाटकातील अधिकारी आणि महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांकडून घेतली जात आहे. राजापूर बॅरेजमधून 1 लाख 80 हजार क्युसेक, दूधगंगेतून 2 लाख 25 हजार क्युसेक पाणी कल्लोळ बॅरेजजवळ सोडले जात आहे. अलमट्टी जलाशयातून दररोज 1 लाख 75 हजार ते 3 लाख क्युसेक पाणी सोडण्याचे काम सोपविण्यात आले असून, अतिरिक्त पाणी साचू नये यासाठी लक्ष ठेवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक तालुक्यात नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच नागरिकांच्या माहितीसाठी त्यांचा मोबाईल नंबरही सोशल मीडियावर देण्यात आला आहे. बेळगाव जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासनाकडून पूर हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

खानापूर तालुक्यातील आमगाव येथील महिलेचा योग्य उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याच्या घटनेबाबत दु:ख व्यक्त करत आज आपण, जिल्हा पालकमंत्री, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यवाह राहुल शिंदे व इतर अधिकाऱ्यांनी वन परिक्षेत्र विभागातील वस्त्यांना भेट दिल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. खानापूर आणि त्या भागातील लोकांना मुलभूत सुविधा पुरवायच्या की इतरत्र स्थलांतरित करायचे याचा निर्णय घेणार असल्याचेहि जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमा शंकर गुळेद बोलताना म्हणाले की, जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला असून जिल्ह्यातील 36 पूल पाण्याखाली गेले आहेत. दररोज स्वत: जिल्हाधिकारी आणि जिल्हा पंचायत सीईओ अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भागाला भेट देऊन पाहणी करत आहेत. कोणालाही पाण्यात न जाण्याचा इशारा देण्यात येत असल्याचे ते म्हणाले. याचप्रमाणे जिल्ह्यात अतिवृष्टीचे व्यवस्थापन पुरेशा पद्धतीने केले जात असून कोणतीही अडचण येत नसल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणाले. जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाल्यास जिल्हा प्रशासन सर्व प्रकारची खबरदारी घेत असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.

Tags: