Belagavi

मतिमंद मुलीवर अत्याचाराप्रकरणी कडोली गावात बंद

Share

काल रात्री मतिमंद मुलीवर झालेल्या अत्याचाराप्रकरणी बेळगाव तालुक्यातील कडोली गावात आज बंद पाळण्यात आला. वारंवार गावात अशांतता निर्माण करणाऱ्या कुटुंबाला गावातून हाकलून द्यावे, या मागणीसाठी कडोली ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.

बेळगाव तालुक्यातील कडोली गावातील मुस्लिम समाजातील 30 वर्षीय तरुणाने त्याच गावातील 22 वर्षीय मतिमंद हिंदू मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तरुणीचे आई-वडील शेतात गेले असता आरोपीने घरात घुसून हे कृत्य केले. तरुणीच्या काकांनी याचवेळी तरुणाला पकडून मारहाण केली, तसेच पोलीस स्थानकात तक्रारही दाखल केली. संबंधित तरुणाला पोलिसांनी काही तासातच अटक केली. या तरुणाने काही दिवसांपूर्वी गावातील एका हिंदू तरुणाची हत्याही केली होती. गावात वारंवार अशांतता निर्माण करणाऱ्या या तरुणाच्या संपूर्ण कुटुंबाला गावाबाहेर काढण्याची मागणी करत कडोली गावात आज कडकडीत बंद पाळण्यात आला शिवाय ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

याबाबत अधिक माहिती देताना केपीसीआयएस सदस्य मलगौडा पाटील म्हणाले, गावात घडलेल्या घटनेनंतर जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या आदेशानुसार मुलगी व तिच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. गावात अशांतता निर्माण करणाऱ्या तरुणांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली.

या कुटुंबामुळे गावात अनेकवेळा असे प्रसंग घडत असून कुटुंबामुळे उद्भवत असलेल्या समस्या यावेळी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना समजावून सांगितल्या. मतिमंद मुलीशी गैरवर्तन करणाऱ्या तरुणाला योग्य ती शिक्षा द्यावी, अशी मागणीही यावेळी ग्रामस्थांनी केली.

यावेळी या आंदोलनात कडोली ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Tags: