Belagavi

कारगिल युद्धातील शहीद जवानांच्या मुलांना सरकारी नोकरी देण्याची मागणी

Share

26 जुलै रोजी आपला देश कारगिल विजयाचा 25 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. मात्र, हे युद्ध लढून शहीद झालेल्या कुटुंबियांना अद्याप सरकार दरबारातून विवंचनाच मिळाली आहे. उदरनिर्वाहाच्या चिंतेने शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या डोळ्यात अद्यापही अश्रू तरळत आहेत.

3 मे 1999 ते 26 जुलै 1999 या कालावधीत झालेल्या कारगिल युद्धात देशातील अनेक जवानांना प्राण गमवावे लागले. बेळगाव जिल्ह्यातील सुमारे 7 जवानांनी कारगिल युद्धात आपले प्राण दिले. 26 जुलै रोजी भारत कारगिल विजयाचे 25 वे वर्ष साजरे करत आहे. मात्र देशासाठी ज्या कुटुंबीयांनी आपले बलिदान दिले त्यांना आता आपल्या मुलांच्या भविष्याची चिंता सतावत आहे.

कारगिल युद्धात अनेकांनी आपल्या घरातील कर्त्या माणसाला गमावले. एका शहीद जवानाच्या पत्नीने तर आपल्या ७ ते ८ महिन्यांच्या नवजात मुलांना घेऊन आतापर्यंत आपले आयुष्य जगले आहे. ज्यावेळी त्यांच्या पतीचे निधन झाले त्यावेळी आपली मुले लहान होती. सरकारने त्यावेळी अनुदान दिले. तसेच भविष्यात आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी विविध प्रकारची मदत देण्याचे आणि शहीद जवानांच्या मुलांना सरकारी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आज मुले मोठी होऊनही सरकार आपली आश्वासने पूर्ण करत नाही. सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवून आपण थकलो आहोत. मुलं मोठी होऊन शिकून शिकली तरी त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नाहीत. अशी व्यथा शहीद जवानाच्या पत्नीने व्यक्त केली.

शहीद जवानांच्या कुटुंबीयांना जमीन देऊ तसेच घर बांधण्यासाठी जागा देण्याची आश्वासने आपल्याला देण्यात आली. देशासाठी बलिदान दिलेल्या जवानांच्या कुटुंबीयांना कुठेही मदत मिळत नाही. शहीद सैनिकांच्या पत्नी आजीवन पेन्शनवर जगू शकतात. मात्र आईच्या निधनानंतर मुलांना त्यांच्या भविष्याची चिंता सतावत असते असेही एका शहीद जवानांच्या कुटुंबीयांनी सांगितले.

आपल्या आईने वडिलांच्या निधनानंतर खडतर जीवन जगले आहे. आपण आता शिकून मोठे झालो आहोत. पण अद्याप आम्हाला सरकारी नोकऱ्या मिळालेल्या नाहीत. सरकारी कार्यालयात वारंवार फेऱ्या मारून आपण थकलो आहोत असे एका शहीद जवानाच्या मुलाने सांगितले.

शहीद जवानांच्या कुटुंबीयांनी संबंधित लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांकडे अनेकदा दाद मागितली पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याचा नियम असतानाही सरकार त्याचे पालन करत नसल्याबद्दल माजी सैनिक महासंघाचे अध्यक्ष जगदीश पुजारी यांनी नाराजी व्यक्त केली. माजी सैनिक संघटनेच्या नेतृत्वाखाली शहीद जवानांच्या कुटुंबीयांनी आज विधानपरिषद सदस्य नागराज यादव यांना याप्रश्नी निवेदन दिले.

Tags: